संग्रहित फोटो
पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाई करून तडीपार गुन्हेगारासह कोयतेधारी टोळक्याला जेरबंद केले आहे. गुन्हेगार शहर व जिल्ह्यातून तडीपार केल्यानंतर देखील आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात येत धारधार कोयता घेऊन फिरत होता. तर दुसऱ्या कारवाईत घातपाताचा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या कोयतेधारी तिघांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन कारवाईत चौघांना अटक करून, ५ कोयते, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.
याप्रकरणात पोलिसांनी पहिल्या कारवाईत कोयते घेऊन फिरणाऱ्या प्रकाश काळु कांबळे (वय २०, रा. कात्रज), मयुरेश्वर दत्तात्रय इटकर (वय १८) व अक्षय रविंद्र चव्हाण (वय १८, रा. कात्रज) यांना तसेच तडीपार गुन्हेगार रोहित महादेव पाटील (वय २१, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याला अटक केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपनगर व शहरात नव्याने दाखल झालेला लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सराईतांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान, लोणी काळभोर पोलिसांना काहीजन घोरपडे वस्ती भागात तिघे एका दुचाकीवरून कोयते घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी प्रकाश, मयुरेश्वर व अक्षय या तिघांना पकडले. त्यांच्याकडून चार कोयते, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून मोठा घातपात करण्याची तयारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
तडीपार गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद
लोणी काळभोर पोलिसांनी या कारवाईसोबतच तडीपार असताना देखील पुन्हा आदेशाचा भंग करून फिरणाऱ्या रोहित पाटील याला पकडले आहे. त्याची झडती घेतली असता त त्याच्या शस्त्र आढळून आले. तो कशासाठी हद्दीत आला होता, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.






