सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खुन प्रकरणात पोलिसांनी आरोपींसोबत हत्यारे आणणे आणि पुरवणे यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एकाला अटक केली आहे. संगम संपत वाघमारे (वय २०, रा.आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वनराज आंदेकर खूनप्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून झाला होता. या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी एक महिला – वनराजची बहीण – तसेच इतर पुरुष अशा एकूण १५ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. तर ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तपासात प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या १३ जणांना पकडले असता त्यांच्याकडे पिस्तुलांबाबत चौकशी सुरू केली होती. तेव्हा हे पिस्तुल एक ते दीड वर्षांपूर्वी मध्यप्रदेश येथून आणल्याचे समोर आले होते.
सखाल तपास सुरु
अधिक तपासात हे पिस्तुल आकाश म्हस्के व अनिकेत दुधभाते आणि अटक केलेल्या संगम वाघमारे यांनी आणले असल्याचे समोर आले आहे. संगम वाघमारे याने हत्यारे आणणे व पुरवणे यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असल्याचे आले आहे. त्याच्याकदडे सखोल तपास केला जात आहे.
खुनाच्या घटनेने प्रचंड खळबळ
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भररस्त्यात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. 5-6 बाईक्सवरून आलेल्या हल्लेखोरांनी वनराज यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.एवढेच नव्हे तर ते खाली कोसळल्यावर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आले. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आंदेकरांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुण्यासारख्या शहरात,रात्री, वर्दळीच्या जागी भररस्त्यात असा गुन्हा घडतो, कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हल्लेखोर एकाचा थेट जीव घेतात या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून शहरात दहशतीचं वातावरण आहे.