सावन वैश्य | नवी मुंबई: राज्य शासनाने अमली पदार्थांची निर्मिती तस्करी तथा विक्री करणाऱ्या टोळ्यांवर, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची दुरुस्ती केल्यावर, नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 6 जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील 6 ही आरोपी सध्या कारागृहात असून, त्यांच्यावर मकोका कलम लावल्याने पोलीस त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत, नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. तसेच राज्य शासनाने अमली पदार्थांची तस्करी विक्री तसेच सेवन करणाऱ्याटोळ्यांवर सुधारित महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ संबंधित टोळीअंतर्गत मकोका गुन्हा दाखल केला आहे. अमली पदार्थ संबंधित टोळ्यांवर कारवाई करणारे नवी मुंबई पोलीस हे पहिले पोलीस दल ठरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
11 जुलै 2025 रोजी अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना माहिती मिळाली होती की, दिघा, ईश्वर नगर मधील ओमकार अपार्टमेंट मध्ये, मोठ्या प्रमाणात एमडी नामक ड्रग्सची साठवणूक करून त्याची विक्री करत आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, निगडे यांनी एक पथक स्थापन करून सदर ठिकाणी धाड टाकली होती.
Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण
पोलिसांनी त्या ठिकाणावरून 75 लाख 69 हजार रुपयांचे एमडी नामक ड्रग्स हस्तगत केले होते. यामध्ये उषा रोशन नाईक, शैलेश बसन्ना नाईक, उर्फ पिल्लू, ज्योती निलेश नाईक, निलेश बसन्ना नाईक, रोशन बसन्ना नाईक, शांताबाई किसन करंडेकर, सर्व राहणार दिघा, या 6 जणांना अटक केली होती. त्यांच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली होती. मात्र आता त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) या सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यामुळे, त्यांना चौकशीसाठी पोलीस पुन्हा ताब्यात घेणार आहेत.तसेच या गुन्ह्यातील सचिन कणसे, उर्फ काका, राहणार ठाणे, हा आरोपी फरार असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
राज्य शासनाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कायद्यामध्ये दुरुस्ती केल्याने, अमली पदार्थ विक्री तस्करी, तसेच सेवन करणाऱ्या टोळ्यांवरती कायद्याचा धाक राहून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल. नवी मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.