खंडाळा बसस्थानकात अपघात(संग्रहित फोटो)
पुणे : खडकवासला धरण परिसरात भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रोहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवासला) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मते हे १० मे रोजी खडकवासला धरण परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करुन अपघात केल्याचे मते यांनी तक्रारी म्हंटले आहे. सहायक निरीक्षक यादव तपास करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एअरपोर्ट-लोहगाव रस्त्यावर घडली आहे. रोशनकुमार सिंह (वय २९, रा. वाघोली) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत रोशनचा भाऊ पवनकुमार याने तक्रार दिली आहे. याप्रकरणी विजय कैलास भगत (वय २५) याच्यावर विमानतळ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.