संग्रहित फोटो
पुणे : नागपूरच्या महालमधील झेंडा चौकात दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर काल मोठी जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली होती. यावेळी जमावाल पांगवताना एका गटातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. दरम्यान या घटनेत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पुणे शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला. वादातून दगडफेक, तसेच वाहने जाळण्याची घटना घडली. पोलिसांनी एकूण ७० जणांना पकडले. सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र, अफवा होऊन इतर शहरात त्याचे परिणाम पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तर, संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढविली असून, रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवला आहे.
पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवावे तसेच संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही आदेश दिले आहेत. तर गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही अनुचित घटना प्रकार घडल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवले जात असून, अशांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचारा प्रकरणी निवेदन देले आहे. ते म्हणाले, “काल १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी असे नारे दिले. यावेळी त्यांनी औरंगजेबाजी प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर विविध कलमांतर्गत दुपारी गुन्हे दाखल केले.” “यानंतर सायंकाळी, सकाळी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा परवण्यात आली. त्यानंतर अत्तरओळमधील नमाज आटोपून २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.” “यानंतर पोलिसांनी एकीकडे सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारावाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर, दुसरीकडे हंसापुरी भागात २००-३०० लोकांनी दगडफेक केली. यामध्ये काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला तर अनेक वाहने जाळण्यात आली”, असेही फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले.