संग्रहित फोटो
पुणे : मुळच्या बांगलादेशी असलेल्या दोन सख्या बहिणी पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करून त्यांनी भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड व आधार कार्ड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी शोध मोहिम राबवत या दोघींसह एका पुरूषाला बेड्या ठोकल्या आहेत. आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लीझा मकबूल शेख उर्फ खातून तस्लीमा मोफीजूर रेहमान (रा. कात्रज, मुळ बांगलादेशी), रिंकी देवी व तिचा पती प्रमोद कुमार चौधरी (रा. फतेहपुर, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले व त्यांच्या पथकाने केली आहे.
बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भारतातील मेट्रोसिटीत बेकायदा वास्तव्य करत असल्याचे समोर आलेले आहे. या बांगलादेशी नागरिकांकडून भारतीय कागदपत्रे देखील काढल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे. दरम्यान, पोलिसांना या लिझा शेखबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालून या महिलेची माहिती घेत तिचा शोध घेतला. तिचा राहत्या घरी अचानक छापा टाकल्यानंतर तिघे त्याठिकाणी सापडले. परंतु, त्यांनी भारतीय कागदपत्रे दाखविली. पण, बोलण्यात संशय वाटल्याने त्यांनी सखोल तपास करून पुर्ण घराची झडती घेतली. या झडतीत लीझा हिचा बांगलादेशी पासपोर्ट मिळाला. त्यानंतर ते बांगलादेशी असल्याचे समोर आले.
असा आला संशय
लीझा हिने भारतीय पासपोर्ट काढल्यानंतर तीन तीन वेळा बांगलादेशात जाऊन आली. तेव्हा पोलिसांना तिच्यावर संशय आला. यामुळे पोलिसांनी तिच्यावर वॉच ठेवला. तिने राहते घर देखील बदलले. नंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून हा प्रकार उघड आणला.
जन्म दाखल्यासह इतर कागदपत्रे
लीझा शेख हिने प्रमोद चौधरी ह्याच्यासोबत विवाह केला आहे. प्रमोद याने या दोघींचे बिहारमधून जन्म दाखला, शाळेचा दाखला काढून घेतला. नंतर त्यांचे पॅनकार्ड व आधार कार्ड काढले. या कागदपत्रांवरून त्यांनी पासपोर्ट मिळविला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अन्यथा सोडून द्यावे लागले असते…
पोलिसांनी लिझा शेखच्या घरावर छापा मारल्यानंतर त्यांनी भारतीय कागदपत्रे दाखविली. ती खरीही वाटत होती. पण, पोलसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी घरातील कोणा-कोणा आणि प्रत्येक बॅगची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना लेफ्टवर ठेवलेल्या एका बॅगेत बांगलादेशी पासपोर्ट मिळाला. नंतर त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली. तेव्हा त्यांनी बांगलादेशी असल्याचे मान्य केले. ते गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहतात. तर गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून पुण्यात राहत असल्याचे समोर आले आहे.