मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल (File Photo : Suicide)
नागपूर : संपत्तीच्या वादातून आणि घटस्फोटासाठी होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पोलिस कर्मचाऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मृताची पत्नी व प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर (वय ४२, रा. कृष्ण निसर्ग अपार्टमेंट, इसासनी) असे मृत पोलिसाचे नाव आहे. आरोपींमध्ये पत्नी रुचिका बेलेकर (वय ३२) आणि महेश मेश्राम यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीलरत्न हे प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. महेश हा व्यवसायाने शिक्षक आहे. दोन वर्षांपासून रुचिका आणि महेश यांच्यात प्रेमसंबंध होते. याची माहिती शीलरत्न यांना मिळाल्यानंतर दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले. त्यानंतर रुचिका घटस्फोटाची मागणी करू लागली तसेच संपत्तीत हिस्सा देण्यासाठी दबाव टाकत होती. शिवाय, खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असल्याचेही समोर आले आहे. अनेकदा तिने शीलरत्न यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. महेशही त्यांना त्रास देत असल्याने शीलरत्न मानसिक तणावाखाली होते.
दरम्यान, २२ फेब्रुवारीला शीलरत्न भावाला भेटण्यासाठी गेले होते. काही वेळ थांबल्यानंतर ते बाहेर गेले आणि त्यानंतर बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. २४ फेब्रुवारीला त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात आढळला. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
कोणीही अटकेत नाही; पोलिसांचा तपास सुरु
तपासादरम्यान मृताच्या भावाने घडलेली बाब समोर आणल्यानंतर पोलिसांनी रुचिका बेलेकर व महेश मेश्राम यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक केली नाही. पुढील तपास सुरू आहे.
ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.






