वडगाव मावळमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची केली हत्या केली (फोटो - istock)
Maval Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील केशवनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. 18 एप्रिल रोजी ही हत्येची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Crime News)
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भाग-5 गुन्हा क्रमांक 114/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 115(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आप्पासो सुखदेव कदम (वय 65, रा. गोतंडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी आपल्या मुलीच्या हत्येबाबत तक्रार नोंदवली आहे.
वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला सौ. सोनाली विनोद कणसे (वय 35, रा. केशवनगर, वडगाव मावळ) हिचा तिचा पती विनोद लालासे कणसे (वय 37) याच्यावर खुनाचा आरोप आहे. सोनाली हिचे लग्न झाल्यापासून आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या संशयातून तो वारंवार तिच्याशी वाद घालत, शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Buldhana Crime: DJ वर नाचताना धक्का लागल्यावरून वाद; 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
दि. 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.30 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान, केशव हाइट्स, केशवनगर येथील त्यांच्या राहत्या घरात दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक स्वरूपात झाले आणि आरोपीने संतापाच्या भरात कोणत्यातरी कठीण वस्तूच्या सहाय्याने पत्नीच्या डोक्यावर, छातीवर तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. या गंभीर मारहाणीमुळे सोनाली कणसे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर दि. 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:08 वाजता वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली. स्टेशन डायरी नोंद क्रमांक 26/2026 अशी असून, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
हे देखील वाचा : जुन्नरमध्ये भीषण अपघात! हायवा-कार समोरासमोर धडक; नायब तहसीलदारांचा मृत्यू, दोघे जखमी
पोलिसांनी आरोपी विनोद कणसे याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच प्रकरणाची माहिती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC), वडगाव मावळ न्यायालय यांना पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक पाटील तसेच तपासी अधिकारी सपोनि राऊळ यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे






