सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/अक्षय फाटक : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मंडळाने काढलेल्या मिरवणूकीत निरपराध तरुणाला मारहाण प्रकरणात तिघांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, माध्यमांत बातम्या अन् केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी धावपळ करत खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावले. दुसरीकडे गुंडाची खैर नाही असे पोलीस आयुक्त सांगत असताना याप्रकरणाची गुप्तता पाळण्यात आल्याने नेमके प्रकरण इतक्या गुप्ततेने का हातळले गेले असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५,रा. शिंदे चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालाबहादूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक व पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार आहे. हा प्रकार कोथरुडमधील भेलकेनगर चौकात १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता. याबाबत देवेंद्र जोग याने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे.
जोग हा आयटी कंपनीत नोकरीला आहे. तो घटनेच्या दिवशी दुचाकीवरुन जात होता. तेव्हा गजानन मारणे मंडळाने शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती. मिरवणूकीच्या समोरून तो दुचाकीने निघाला होता. त्याने हॉर्न वाजविल्यानंतर चौघांनी त्याला अडविले. त्यांना मिरवणूकीत गाडी घातल्याचा राग आला. त्यांनी काय रे गाडी हळु चालविता येत नाही़ धक्का मारतो का, असे म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. तरीही जोग म्हणाला दादा मी तुम्हाला धक्का दिला नाही. परंतु, इतरांनी त्याला थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. तोंडावर व नाकावर मारहाण झाल्याने त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे दुचाकीवरुन खाली पडल्याने खरचटले. त्यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केली. ऐन गर्दीत मारहाण झाल्याने मोठी गर्दी झाली. नंतर मारहाण करणारे गुजरात कॉलनीच्या दिशेने पळाले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. कुख्यात गजा मारणेच्या टोळीतील मुलांनी मारहाण केलेली असताना हे प्रकरण किरकोळ स्वरूपात घेण्यात आले. मात्र, माध्यमात तसेच केंद्रीय मंत्र्यांनी जखमी जोगशी विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी यात गांर्भियाने दखल घेतली. दुसऱ्या दिवशी रात्री या आरोपींना अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
जाणीवपूर्वक जीवे मारण्याच प्रयत्नाचा गुन्हा- अॅड. विजयसिंह ठोंबरे
तीन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद केला. सुरवातीला किरकोळ मारहानीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. अश्या प्रकारे खोटे गुन्हे दखल होणार असतील तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ठोंबरे यांनी सांगितले. दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानतंर न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली.
चौघेही सराईत गुन्हेगार..!
पसार झालेला आरोपी बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हा फरार आहे. बाब्या पवारवर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे कोथरुड, भारती विद्यापीठ, पौड, अलंकार पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४ गुन्ह्यामध्ये त्याची निर्दोष सुटका झाली आहे. अमोल तापकीर याच्यावर कोथरुड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याच्या तयारीत, मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. किरण पडवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अॅक्ट खाली ४ गुन्हे दाखल आहेत. ओम धर्मजिज्ञासू याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण करुन खंडणी मागणे, मारामारी असे चार गुन्हे दाखल असून, त्यातील एका गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली आहे.