संग्रहित फोटो
पुणे : मंडई मेट्रो स्टेशनजवळ घडलेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहिल्यानगरमधील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नसून, त्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. मु. पो. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार समोर आला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, अनिकेत बाबर, निलेश साबळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
मंडई मेट्रो स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. तत्काळ गुन्हे शाखा व विश्रामबाग पोलिसांनी तपास सुरू केला होता. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ होते. तो फिरस्ता असल्याचे समोर आले. पण, त्याची ओळख मात्र पटली नाही. त्याचदरम्यान, सीसीटीव्ही व बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रमेश सत्रे नावाच्या व्यक्तीने हा खून केला आहे. त्यानूसार रमेशचा शोध सुरू केला.
रमेश याला शिरूर तालुक्यातून पकडले. चौकशीत त्याने खून केल्याची कबूली दिली. रमेश हा व्यसनी आहे. तर मयत हा फिरस्ता होता. त्यालाही दारूचे व्यसन आहे. दरम्यान मध्यरात्री मयताने रमेशकडे दारू मागितली होती. तेव्हा रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्यात वादविवाद झाले. रागाच्या भरात रमेशने चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.