खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण
नाशिकमधील इगतपुरी येथील रहिवासी असलेले पीडित संदीप पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत धक्कादायक खुलासे केले आहेत. संदीप पाटील यांनी ४०० कोटींचा कंटेनर गायब केल्याचा आरोप करत आपले अपहर करण्यात आले. तसेच अज्ञात ठिकाणी नेऊन आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली, इतकेच नव्हे तर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली,असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. या कटात काही बडे व्यावसायिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असून ही प्रचंड रोख रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची (Builder) असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, अपहरणाची तक्रार दिल्यांतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १. जयेश कदम (रा. रामगड) २. विशाल नायडू (रा. कल्याण), ३. सुनील धुमाळ (रा. टिटवाळा), ४. विराट गांधी (रा. गुजरात) याला जयपूरमधून अटक करण्यात आली असून तो एका बिल्डरचा मॅनेजर असल्याची माहिती आहे. तर ५. जनार्दन धायगुडे (रा. मुंबई) या पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे.
तर या प्रकरणातील मुख्य संशयित मानले जाणारे ठाण्यातील बिल्डर किशोर सावला आणि इतर दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’
हा संपूर्ण प्रकार एका सुनियोजित कारस्थानाचा भाग असल्याचे तपासातून आढळून आले. ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर २०२५ मध्ये) कर्नाटकातील चोरली घाटात घडली होती. दोन हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या (Demonetised) नोटांनी भरलेले दोन कंटेनर गोव्याहून एका देवस्थानासाठी (काही सूत्रांनुसार तिरुपती बालाजी ट्रस्टकडे) जात असल्याचा बनाव रचण्यात आला होता.
या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटींची रोकड होती आणि ती लुटण्यात आल्याचा दावा तक्रारदार तरुणाने केला . मात्र, या नोटा नेमक्या कोणाच्या होत्या आणि त्या कुठे जात होत्या, हे गूढ अद्याप कायम आहे.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.ही प्रचंड रक्कम निवडणुकीच्या काळात वापरली जाणार होती का? आणि यात कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे का? या दिशेने ‘एसआयटी’ तपास करत आहे. तसेच, जुन्या नोटा बदलून देण्यासाठी गुजरातच्या एका आश्रमासोबत ६०:४० या प्रमाणात व्यवहार ठरल्याचीही चर्चा आहे.






