संग्रहित फोटो
पुणे : कराड पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या आरोपीने बुधवारी (दि.२६) सकाळी पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक केली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संतोष यशवंत साठे (५२, रा. मासोळी, कराड) असे पळन गेलेल्या आरोपीचे नाव आहे. साठे याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. साठे हा ग्रामसेवक असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून निलंबीत करण्यात आलेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे याची इंस्टाग्रामवरून एका महिलेशी ओळख झाली होती. त्याच महिलेच्या तक्रारीनुसार त्याच्यावर काही महिन्यांपुर्वी गुन्हा दाखल झाला. त्यात त्याला अटक झाली. जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा तो महिलेला भेटण्यास गेला गेला. त्यामुळे त्याच्यावर परत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कराड तालुका पोलिसांनी अटक केली. अटकेत असताना छातीत दुखत असल्याने त्याला मंगळवारी ससून रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याच्यासोबत कराड तालुका पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी होते. डॉक्टरांनी त्याला तपासणी केली.
तसेच आराम करण्याचा सल्ला दिला. त्याला रुग्णालयातच दाखल करून घेतले. बुधवारी सकाळी मात्र, त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपासावरून साठेचा शोध घेण्यात येत आहे. बंडगार्डन पोलीस आणि कराड तालुका पोलीस त्याच्या मागावर आहेत.