बारामतीच्या घटनेतील महिलेचा मृत्यू (फोटो- istockphoto)
बारामती: वालचंदनगर एस टी बसमध्ये गेल्या १० दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने एका तरुणावर हल्ला केल्यामुळे भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झालेल्या बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) या विवाहित महिलेचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी अंत झाला.
काटेवाडी (ता. बारामती) येथे दि ३१ ऑगस्ट रोजी बारामती वालचंद नगर बस मधून वर्षा भोसले या वालचंदनगर या त्यांच्या माहेरी निघाल्या होत्या. या बस मध्ये अचानक मागील सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर(वय २१, मूळ रा. लातूर, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याने अचानक शेजारच्या सीटवर बसलेल्या पवन अनिल गायकवाड या तरुणावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमध्ये असलेले प्रवासी भयभीत झाले. यामध्ये वर्षा भोसले यांच्यासह इतर महिला व विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने होत्या. त्यादेखील भयभीत झाल्या. काही प्रवाशांनी चालू बस मधून मागच्या बाजूने उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने बस काठेवाडी येथील उड्डाणपुलावर थांबवली, यावेळी पवन गायकवाड हा जीव वाचवण्यासाठी पळाला, त्याच्यासह अन्य प्रवाशांच्या मागे आरोपी अविनाश सगर हा माथेफिरू पळू लागला.
दरम्यान वर्षा भोसले यादेखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाल्या, त्याचवेळी त्या जमिनीवर जोरदार कोसळल्या, यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. त्यांच्या मेंदूत मोठा रक्तस्त्राव झाला .यावेळी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी झडप घालून सदर आरोपीला जेरबंद केले. त्याच्यावर पवन गायकवाड या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी झालेल्या वर्षा भोसले यांना पोलिसांनी बारामती औद्योगिक वसाहतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्राच्या आधारे संपर्क साधून बोलावण्यात आले. वर्षा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरुवातीपासूनच त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. सलग पाच दिवस मृत्यूशी त्या झुंज देत होत्या. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मोठे प्रयत्न केले, मात्र बुधवारी(दि ६)दुपारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वानेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रा. रामचंद्र भोसले यांच्या त्या पत्नी होत, वर्षा भोसले यांच्या मृत्यु पश्चात पती प्रा. रामचंद्र भोसले , एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मूळचे इंदापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी असलेले भोसले कुटुंब बारामती शहरातील यादगार सिटी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. माथेफिरू तरुणाने एका युवकावर बसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यामुळे हकनाक वर्षा भोसले यांचा बळी गेला आहे.