संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील उबाठा गटाचे शाखा प्रमुखाच्या १८ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यूदेह आढळून आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, त्याचा खून झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे ही घटना घडली असल्याचे देखील वडिलांनी सांगितले आहे. साहिल विलास कांबळे (वय १८, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीनंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंचशीलनगर परिसरात येरवडा कारागृहाच्या शेजारीच प्रिटींग प्रेस आहे. कारागृह विभागाचीच प्रेस आहे. दरम्यान, जागेतील जुन्या व पडलेल्या बंगल्यात एका मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानूसार, येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा १८ वर्षीय साहिल कांबळे गळफास लावल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हत्या केल्याचा आरोप…
मुलाने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या झाली आहे. त्याचे पाय जमीनीला टेकलेले होते. त्याला मारून लटकवले गेले आहे. त्याला १६ मार्च पासून अज्ञाताचे कॉल येत होते. महिलेची छेड काढली व गाडीला उडविले, यासंदंर्भात ते फोन होते. मी, विश्रांतवाडी येथील पोलीस चौकीत याबाबत तक्रार दिली होती. पण, त्यावर काहीच झाले नाही. नंतर मुलगा घरी आला नसून, त्याचे अपहरण झाल्याबाबतही तक्रार दिली होती. पण त्याकडे गांर्भियाने पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. मी पोलिसांकडे संबंधिताचे नाव, मोबाईल क्रमांक दिला आहे.