संग्रहित फोटो
सांगली : भारतीय नौदलात भरती करण्याचे आमिष दाखवून १७ तरूणांची १३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बिहारमधील संशयित राहुल कुमार (रा. पोसवन, जि. आरा) याच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल कुमार याने नौदलात कार्यरत असताना ही फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. सध्या तो निवृत्त झाला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील काही तरुण भारतीय नौदलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होते. मार्च २०२२ मध्ये भरतीसाठी काही तरुण मुंबईत भरतीसाठी गेले होते. तेथे नौदलात कार्यरत असलेल्या राहुल कुमार याने तरुणांशी संपर्क साधला. नौदलात ग्रुप ‘सी’ मध्ये भरती करतो, असे त्याने आमिष दाखवले. राहुल कुमार नौदलातच असल्यामुळे तरुणांना नोकरीबाबत खात्री पटली. मुंबईतून आल्यानंतर भरतीसाठी खरशिंग येथील सागर सुभाष मोहिते (वय २३ वर्षे) व त्याचे सहकारी तेजस दत्तात्रय पाटील, उत्तम सदानंद कोरे, प्रतीक भरत माळी, साईराज माणिक पाटील, आशिष लक्ष्मण पाटील, श्रेयस चव्हाण, केदार लाड यांच्याकडून राहुल कुमार याने ऑनलाइन व रोखीने ७ लाख रुपये घेतले, अभिजित शिंदे, त्याचे सहकारी ज्ञानेश्वर शिंदे, शहाजी खरात, संतोष शिंदे, भीमराव ओले, शिवराज पाटील, अक्षय ओलेकर, सुनील लोखंडे, युवराज शिंदे यांच्याकडून ६ लाख ५५ हजार रुपये ऑनलाइन व रोखीने घेतले. एकूण १३ लाख ५५ हजार रुपये घेतले. मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा प्रकार घडला. याबाबत सागर मोहिते याने संंशयित राहुल कुमार याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनायक मसाळे तपास करत आहेत.
पैसे देण्यास टोलवाटोलवी
पैसे घेतल्यानंतर तरुणांनी नियुक्तीचे पत्र मिळण्यासाठी तरुणांनी राहुल कुमार याच्याकडे तगादा लावला परंतु त्याने टोलवाटोलवी केली. आर्थिक फसवणूक झाल्याचे तरुणांना लक्षात आल्यानंतर घेतलेले पैसे परत मिळावे, यासाठी तगादा लावला परंतु राहुल कुमारकडून प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही दिवसांपासून तो ‘नॉट रिचेबल’ झाला आहे.
हे सुद्धा वाचा : पीएमटीचे बस थांबे आता चोरट्यांचे अड्डे; ११ महिन्यात तब्बल ६६ घटना
बिहारमध्ये शोध घ्यावा लागणार
राहुल कुमार याने नौदलात कार्यरत असताना बेरोजगार तरुणांना भरतीचे आमिष दाखवले. तो नौदलात असल्यामुळे विश्वास बसला. त्यामुळे त्याला रक्कम दिली परंतु रक्कम घेतल्यानंतर तो निवृत्त झाला आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांना बिहारमध्ये जाऊन त्याचा शोध घ्यावा लागणार आहे.