संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात मुख्य रस्त्यांसह उपनगरात बुलेटला अल्टर करून सायलेन्सर बसवून त्यातून कर्ण कर्कश्य आवाज काढत बुलेट पळविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एकट्या लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेत २२ बुलेट ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचे सायलेन्सर काढून टाकत त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. याप्रमाणेच पुर्ण शहरात अशा बुलेटस्वारांवर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर ४ पथके तयार केली होती. लोणी काळभोर परिसरामधील वेगवेगळ्या भागात पोलीस नेमण्यात आले. मॉडिफाइड सायलेन्सर, विना नंबरप्लेट अशा एकूण २२ बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आला. या गांड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. तसेच वाहतूक अंमलदार यांच्यामार्फत त्यांच्यावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनांचे मुळे सायलेन्सर बसवून तसेच ज्या गांड्यांना नंबर प्लेट नव्हत्या, त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना नंबर प्लेट बसवून ही वाहने वाहनमालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.
शहरभर कारवाईची गरज
लोणी काळभोर प्रमाणेच पुण्याच्या मुख्यभाग तसेच उपनगरात देखील अश्याच पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे तरुण बुलेटचा आवाज काढत फिरत असल्याचे पाहिला मिळते. कर्णकश आवाजाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सुसाट गाडी चालविताना नागरिकांच्याच मनात धडकी भरते. रात्रीअपरात्री हे प्रमाण मोठे असते. शहरात विशेष अभियान राबवून अशा गाड्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
पुणे शहरभर बुलेटला मॉडीफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढत फिरणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीही दंडूका उगारला होता. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या तब्बल ६१९ दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. २७ वाहतूक विभागाअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यासोबतच यात दुचाकीचे सायन्सर मॉडीफाय करून देणार्या ३१६ जणांवर देखील कारवाई करण्यात आली. तर दुचाकींचे सायलन्सर मॉडीफाईड करणार्या गॅरेजवाले तसेच मॉडीफाईड सायलन्सर विक्रेते यांना देखील कारवाईबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. पुन्हा अशा बुलेट आढळून आल्यामुळे पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत.