सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : सांस्कृतिक नगरीत पिस्तूल बांजाचा वावर वाढल्यानंतर पुणे पोलिसांकडून पिस्तूलांची होणारी तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून, पुणे तसेच साताऱ्यात पिस्तूल विक्रीत सहभागी असणाऱ्या एका टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तर पिस्तुलांचा मध्यप्रदेश व्हाया पुणे असाच प्रवास असल्याचेही पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोन आणि सिंहगड रोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल ९ जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ पिस्तूल आणि जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.
आकाश बळीराम बीडकर (वय २४, रा. दत्तवाडी), सुभाष बाहु मरगळे (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), सागर जानू ढेबे (वय २४, रा. वाडकरमळा, हडपसर), तुषार दिलीप माने (वय २०, भेंडी चौक, आंबेगाव बुदुक), बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. फलटन सातारा), तेजस खाटपे (रा. कात्रज, आंबेगाव),आर्यन विशाल कडाळे (वय १९, रा. बुधवार पेठ, सातारा), शुभम दिनेश बागडे (वय २४, सातारा), पिस्तुल गणेश ज्योतीराम निकम (वय २५, रा. पिरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गावठी बनावटीची ७ पिस्तुले आणि ११ जिवंत काडतुसे असा सुमारे पावणे तीन लाखांचा माल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरीक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिहेरी कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिली दाईंगडे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या यांचे पथक तर युनिट तीनचे रंगराव पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश बीडकर पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला एरंडवणा येथील डीपी रस्त्यावरील बसस्टॉप येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि काडतुस जप्त केले. त्याला ते पिस्तुत सुभाष मरगळे नावाच्या आरोपीच्या मध्यस्थीने मिळाल्याचे समोर आले. मरगळे याने सागर जानू ढेबे याच्याकडून घेऊन आकाश बिडकर याला हे पिस्तूल विकले होते. त्यानूसार पथकाने सागर ढेबेला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही १ गावठी पिस्तुल, ३ जिवंत काडतुसे मिळाले.
दरम्यान सागर ढेबेला विचारणा केल्यानंतर ओंकार लोकरे आणि तो ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दुचाकीवर चालले असताना अथर्व तरंगे नावाचा आरोपी व त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी गोळीबार केला होता. त्यात ओकांरचा मृत्यू झाला तसेच सागर ढेबे याच्या पायावर गोळी मारल्याचे त्याने तपासात सांगितले. अथर्व तरंगे आपल्याला मारणार म्हणून सागर ढेबेने मध्यप्रदेशातून सात पिस्तुले आणल्याचे सांगितले. एक पिस्तुल सुभाष मरगळेला, एक पिस्तुल आर्यन कडाळे याला तर एक पिस्तुल बाळु ढेबे याला दिल्याचे सांगितले. तर दोन पिस्तुल तुषार माने याला दिल्याचे म्हटले.
आर्यन कडाळेने ते पिस्तुल नंतर शुभम बागडेला विकले. दरम्यान शुभमने ते पिस्तुल गणेश निकमला विकले. नंतर त्यांना अटक केली. दरम्यान युनिट दोनच्या पथकाने तडीपार तुषार मानेला अटक केली. त्याला विचारणा केल्यानंतर हे पिस्तुल त्याला तेजस खाटपे याने दिल्याचे सांगितले. ही जप्त करण्यात आलेली पिस्तुले सागर ढेबे याने मध्यप्रदेशातून आणल्यानंतर पकडलेल्या आरोपींना मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे.