संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून सराफी दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी पावणे पाच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रोकड आणि दागिने चोरून नेले आहेत.
बाजीराव रोडवरील बुधवार पेठेतील आर. जे. ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी रितेश पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रितेश यांचे आर. जे. ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. दरम्यान, दुकान दुमजली आहे. खाली सोने विक्रीचे दुकान तर वरती दागिने बनविण्याची जागा व वॉशरूम आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच, दुकानातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्याला आणखी नवीन 5 पोलीस ठाणे! 30 चौक्यांचीही निर्मिती होणार
घरफोड्यांपुढे पोलीस हतबल!
पुणे शहरातील घरफोड्यांपुढे पुणे पोलिसांची हतबलता लोटांगण घेऊ लागली असून, चोरटे पुढे अन् पोलिस मागे असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून असल्याचे पाहिला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांवर चोरटे डल्ला मारत असताना पोलिसांचे हात रिकामेच असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील किरकोळ स्वरूपातच आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात या घटना सलग घडत असून, पुन्हा एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. ज्यात लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. त्यामुळे पुणेकर भयभित आहेत.
पाटण तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट
विहे (ता. पाटण) येथे शनिवारी रात्री वारीला गेलेल्या दांपत्याचे घर फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील साडेआठ तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम घेऊन ४ चोरटे पसार झाले आहेत. गावातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे निदर्शनास आले. त्यादृष्टीने मल्हारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.