संग्रहित फोटो
राजापूर : राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वरमधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या चार संशयीत आरोपींची गाडी राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या गाडीत सात मोबाईल, नऊ हॉटेल व लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर आढळून आले असून, तेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान चारही संशयित आरोपी कर्नाटक येथील असल्याचे तपासात पुढे आले असून, राजापूर पोलिसांकडून कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड येथे रूम बघण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये येऊन हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेवून या चारही संशयितांनी पोबारा केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान याच दिवशी संगमेश्वर येथे देखील या चारही आरोपींनी हॉटेल श्रध्दामध्ये अशाच प्रकारे ग्राहक नोंदणी रजिस्टर लांबवत पळ काढला होता. ही बाब हॉटेल मालकाच्या लक्षात येताच त्याने संगमेश्वर पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. संगमेश्वर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तत्काळ नाकाबंदी केली.
गाडी महामार्गावर साेडून काढला पळ
पोलिसांची सर्वत्र नाकाबंदी असल्याचे लक्षात येताच या संशयितांनी वापरलेली निळ्या रंगाची गाडी (केओ ५१ एमजी ६९०५) महामार्गावर तुरळ येथे सोडून पळ काढला. सावर्डा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ ही गाडी ताब्यात घेतली. या संशयित आरोपींनी राजापूरातील हॉटेल फुडलॅन्ड येथून रोख सहा हजार रूपये लांबविल्याचे तर संगमेश्वर येथील एका हॉटेलमधून साडेपाच हजार रूपये लांबविल्याचे पुढे आले असून, या हॉटेल मालकांच्या तक्रारीवरून राजापूर व संगमेश्वर पोलिसांनी चारही संशयित आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
आयफोनसह सात माेबाईल हस्तगत
राजापूर पोलिसांनी मंगळवारी उशीरा या आरोपींनी वापरलेली ती गाडी ताब्यात घेतली आहे. ही गाडी राजापुरात आणणे शक्य नसल्याने ती सावर्डा पोलीस स्थानकात जमा करून ठेवण्यात आली आहे. दरम्यान त्या गाडीत सापडलेले सात मोबाईल फोन व नऊ नोंदणी रजिस्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या सात पैकी सहा अॅन्ड्रॉईड मोबाईल असून दोन साधे मोबाईल आहेत. यात एक आयफोन देखील आहे. या सर्व मोबाईल मधील सीमकार्ड ही कर्नाटक राज्यातील आहेत. याद्वारेही तपास सुरू आहे.
आराेपी लवकरच सापडतील : यादव
या प्रकरणी पोलिसांकडून कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीही सापडतील, असा विश्वास पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोबीन शेख तपास करत आहेत.






