संग्रहित फोटो
पुणे : पाषाण परिसरातील साई चौकातून पायी निघालेल्या वृद्धाला गाठून दुचाकीवरील दोघांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केल्याची घटना घडली आहे. ओळखीचे असल्याचे भासवून दोघांनी ही लुट केली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने तक्रार दिली आहे. रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पाषाण साई चौकाजवळील रोडवर ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार, वृद्ध व्यक्ती पाषाण भागात एका कामानिमित्त फिरत होते. ते मेकओव्हर ब्युटी पार्लरसमोर फुटपाथखाली उभे होते. त्यावेळी समोरून एका दुचाकीवर दोघेजण आले. मागे बसलेला इसम पुढे येऊन वृद्धांच्या गळ्यात हात ठेवून हिंदीत बोलला, ‘क्या अंकल, कितने दिन हो गये मिले नहीं.’ अचानक झालेल्या या वर्तनाने वृद्ध थोडे बुचकळ्यात पडले. त्यांनी त्याला ‘मैं आपको जानता नहीं, आप कौन हो?’ असे विचारले. दरम्यान, दुचाकी चालवणारा गाडीवरुन उतरला आणि तो वृद्धांच्या पाया पडू लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे वृद्ध आणखी चकित झाले.
नंतर या चोरट्यांनी वृद्धांना एक बिस्किटांचे पॅकेट देत ते जवळील बालाजी मंदिरात दान करण्यास सांगितले. वृद्धांनी त्यास नकार दिला, मात्र त्या दोघांनी आग्रहाने पॅकेट त्यांच्या हातात दिले व काही क्षणातच सुतारवाडीच्या दिशेने पळ काढला. सर्व गोंधळात हातचलाखीने वृद्धांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून नेली. वृद्धांना नंतर चोरीचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. बाणेर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.






