संग्रहित फोटो
भोर : भोर शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नामांकित स्वप्नलोकनगरी सोसायटीमधील तब्बल पाच बंद फ्लॅट्सचे कुलूपे व सेफ्टी दरवाजे तोडून चोरट्यांनी शुक्रवार (दि.१) रोजी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला. या धाडसी चोरीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. याप्रकरणी अविराज अशोक मालुसरे (मूळ गाव – लव्हेरी, सध्या रा. स्वप्नलोकनगरी, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नलोक नगरीतील वेगवेगळ्या इमारतींमधील पाच बंद फ्लॅट्सना चोरट्यांनी रात्रीच्या वेळी टार्गेट केले. चोरट्यांनी घरांचे मुख्य दरवाजे आणि लोखंडी सेफ्टी दरवाजांचे कोयंडे व कुलूपे कटर किंवा अवजारांच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. या चोरीमध्ये गणेश सुदाम खोपडे, लोकेश दशरथ भगत, अभिजित शामराव फरगडे,श्रीमंत सुभाष बोडके आणि अविराज अशोक मालुसरे यांच्या राहत्या घरांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी तीन घरांमध्ये चोरट्यांना सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हाती लागली, तर दोन घरांमध्ये काहीच न मिळाल्यामुळे चोरट्यांनी केवळ तोडफोड करून संतापजनक प्रकार केला.
विशेष म्हणजे, या सोसायटी मधील घरांच्या मुख्य दरवाजांना सुरक्षेच्या दृष्टीने बळकट लोखंडी सेफ्टी दरवाजे बसवलेले असतानाही, ते तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सणासुदीच्या व पावसाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे भोर शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिला खोत आणि पोलीस हवालदार धर्मराज खांडे करीत आहेत.
बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला
बसप्रवासात आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करण्याच्या घटना कात्रज आणि स्वारगेट परिसरात घडल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, दागिने आणि रोकड असा सुमारे एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






