ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण (Photo - Social Media)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संघटनात्मक घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. कल्याण लोकसभा महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का मानला जात आहे. अलीकडच्या काळात पक्षातील काही नेत्यांच्या निर्गमनानंतर आता या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
वैशाली दरेकर राणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांची लढत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात झाली होती. निवडणुकीनंतरही त्या पक्ष संघटनेत सक्रिय होत्या. मात्र, आता त्यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून त्या महिला जिल्हा संघटक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, सध्या वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे पक्षाच्या कामाला आवश्यक वेळ देता येत नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पक्षाने हा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.
वैशाली दरेकर राणे यांनी राजीनाम्यामागे केवळ वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला, तरी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार का किंवा काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडीही चर्चेचा विषय ठरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत ‘मातोश्री’वर आयोजित बैठकीत दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले होते.
या प्रकारामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर वैशाली दरेकर राणे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटासमोरील संघटनात्मक आव्हाने पुन्हा अधोरेखित झाली आहेत. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत त्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नसल्याने येत्या काही दिवसांत त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






