संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसही वेळोवेळी करत आहेत मात्र फसवणुकीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २९ वर्षीय तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, तक्रारदार तरुण उबाळेनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याला दाखविले होते. तरुणाने शहानिशा न करता चोट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी २९ लाख ८० हजार रुपये जमा केले.
चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. तरुणाने परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा चाेरट्यांनी टाळाटाळ सुरू केली. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद करुन ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : 18 कोटी रुपये, कोथरूडमध्ये फ्लॅट अन्…; आंदेकर कुटुंबाचे आणखी काळे कारनामे समोर
पहिल्या पत्नीशी घटस्फोट नसताना केलं दुसरं लग्न
पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालेला नसताना देखील घटस्फोट झाल्याची खोटी कागदपत्रे दाखवून दुसर्या महिलेसोबत विवाह केला. विवाहानंतर तिला हाताने मारहाण करून शाररिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत संदेश दळवी (वय ३२, रा. अमरजीत सोसायटी, मगरपट्टा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३९ वर्षीय महिलेनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २५ मार्च २०२२ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने महिलेवर खोटे प्रेमाचे नाटक केल्याचे व पत्नीबरोबर घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.