नागपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसाचार प्रकरणावर विश्व हिंदू परिषद (विहिंप) आक्रमक झाली आहे. परिषदेकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, नागपुरातील हिंसा पूर्वनियोजित होती आणि या हिंसेमागे असलेले अनेक जण अजूनही मोकळे फिरत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अनेक विहिंप कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलं जात आहे, असा गंभीर आरोप विहिंपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला आहे.
पूर्वनियोजित हिंसेचा आरोप, अजूनही धमक्यांचे कॉल सुरू
मिलिंद परांडे यांनी सांगितले की, “नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना फोनद्वारे धमकावलं जात आहे. या धमक्या देणारे तेच लोक आहेत जे दंगल घडवण्यात सहभागी होते. यातील बरेच जण अजूनही मोकळे असून, यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.”
औरंगजेब कधीच आदर्श ठरू शकत नाही
विहिंपने नागपुरात घेतलेल्या आंदोलनाचा बचाव करत परांडे म्हणाले, “बजरंग दल आणि विहिंपने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानासाठी आंदोलन केलं. हे आदर्श पुरूष देशासाठी प्रेरणास्थान आहेत. औरंगजेबासारखा अत्याचारी व्यक्ती कधीच या देशात आदर्श ठरू शकत नाही.”
जातनिहाय गणनेवर विहिंपची स्पष्ट भूमिका
जातनिहाय जनगणना या राष्ट्रीय मुद्द्यावरही विहिंपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिलिंद परांडे यांनी सांगितले की, “विहिंप हे संघटन हिंदू धर्माच्या एकात्मतेसाठी काम करत आहे. आम्ही कोणत्याही जातीसाठी वेगळं धोरण घेत नाही. सरकारने संपूर्ण लोकसंख्येची जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्वागतार्ह आहे. यात मुस्लिम समाजातील विविध जातींचीही गणना होणार असून, त्यामुळे पसमांदा मुस्लिम, म्हणजेच मागास मुस्लिम समाजाची वस्तुस्थिती समोर येईल.”
नाशिक महाकुंभसाठी जागेची कमतरता
विहिंपने येत्या नाशिक महाकुंभच्या आयोजनाबाबतही चिंता व्यक्त केली आहे. परांडे म्हणाले, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यासाठी उपलब्ध जागा ही इतर कुंभ स्थळांशी तुलना करता खूपच कमी आहे. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आम्ही सरकारशी आणि संत समाजाशी संवाद साधत आहोत. मात्र जागेच्या मर्यादेमुळे सर्व अडचणी सोडवणं शक्य नाही.”
विहीपचे म्हणणे काय ?
ससून हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, तपासात सुरक्षारक्षकाचा धक्कादायक उलगडा