कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु असून पहिल्या टप्प्यापासून भाजप आघाडीवर आहे. आत्ताच्या टप्प्यातील मतमोजणीवरुन महायुतीला स्पष्ट बहुमत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यामध्ये भाजपला 124 जागांवर आघाडी तर शिंदेंच्या शिवसेनेला 55 जागांवर आघाडी आहे. तर अजित पवार यांना 38 जागांवर विजय मिळला आहे. राज्यामध्ये काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचा राज्यामध्ये दारुण पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर विधानसभेसाठी मोठ्या अपेक्षा होत्या. राहुल गांधींपासून अनेक दिल्लीचे नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. मात्र काँग्रेसचे राज्यातील चेहरे असलेले बडे नेते हे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः पिछाडीवर आहेत. नाना पटोले यांना 32 हजार 049 मतं पडली आहेत. मात्र त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार अविनाश आनंदराव ब्राह्मणकर हे साकोलीमधून आघाडीवर आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील पिछाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा मतदारसंघ आहे. संगमनेरमध्ये थोरात यांना 58 हजार 242 मत पडली आहेत. त्यांच्या पुढे मात्र भाजपचे उमेदवार आहेत. भाजपचे अमोल धोंडीबा खताळ हे सात हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे सध्या पिछाडीवर आहे. कराड पश्चिम मतदारसंघामधून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत होते. मात्र त्यांना फक्त 46 हजार 690 मतं पडली आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवा डॉ. अतुलबाबा भोसले हे आघाडीवर आहेत. तब्बल अकरा हजार मतांनी भोसले हे आघाडीवर आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे अनेक बडे नेते हे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख हे देखील पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. धीरज देशमुख यांना 10 फेरीतील मतमोजणीनंतर 37 हजार 667 मत पडली आहे. तर त्यांचा विरोधात असणारी रमेश काशिराम कराड हे भाजपचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यांची आघाडी मात्र केवळ दोन हजारांची आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. राज्यामध्ये काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे.