( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
The Odyssey: हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांचा बहुप्रतिक्षित ‘द ओडिसी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, कमाईच्या बाबतीतही तो सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. विशेष म्हणजे, पाचव्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याने त्याने बॉक्स ऑफिसवरील नेहमीचा ट्रेंड मोडीत काढला आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, ‘द ओडिसी’ने पाचव्या दिवशी भारतात अंदाजे 8.35 कोटींची निव्वळ कमाई केली. यासह चित्रपटाची पाच दिवसांची एकूण ग्रॉस कमाई सुमारे 92.63 कोटी, तर नेट कलेक्शन अंदाजे 77.65 कोटींवर पोहोचले आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी चित्रपटाने सुमारे 8 कोटींचा व्यवसाय केला होता. मंगळवारी कमाईत मोठी वाढ झाली.
साधारणपणे आठवड्याच्या मध्यात चित्रपटांच्या कमाईत घट होताना दिसते. मात्र, ‘द ओडिसी’ने हा ट्रेंड मोडत वीकेंडनंतरही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रेक्षक हा चित्रपट ‘मास्टरपीस’ असल्याच्या प्रतिक्रिया देत असून, त्याच्या भव्य दृश्यरचना, कथा आणि दिग्दर्शनाचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, या दमदार कमाईमुळे ‘द ओडिसी’ने ‘धमाल 4’समोर मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत असून, पुढील काही दिवसांत कमाईचा हा सामना अधिक रंगण्याची शक्यता आहे.
‘द ओडिसी’ हा चित्रपट ग्रीक पौराणिक कथांवर आधारित आहे. या कथेत राजा ओडिसियस आपल्या कुटुंबाचे आणि राज्याचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावत धोकादायक प्रवासाला निघतो. समुद्रातील संकटे, रहस्यमय प्राणी आणि अनेक कठीण आव्हानांचा सामना करत तो आपल्या पत्नी आणि मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. नोलन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कथनशैलीमुळे आणि भव्य सादरीकरणामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.






