Sanya Malhotra (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सान्याच्या मते, अभिनय हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही. एखादी भूमिका समाजात विचार निर्माण करु शकत असेल, तर त्या भूमिकेचं महत्त्व अधिक वाढतं. त्यामुळे ती नेहमी अशाच कथा निवडण्याचा प्रयत्न करते, ज्या महिलांच्या आयुष्याकडे वास्तववादी नजरेने पाहतात. तिच्या मते, पडद्यावर महिला केवळ सहाय्यक पात्र म्हणून नव्हे, तर स्वत:च्या निर्णयांवर उभ्या राहणाऱ्या व्यक्ती म्हणून दिसणं गरजेचं आहे.
तिने सांगितलं की, अभिनेत्री होण्याचं स्वप्र ती लहानपणापासून पाहत होती. आज त्या स्वप्राची पूर्तता होत असल्याचा आनंद तिला होता, प्रत्येक चित्रपटातून काहीती नवीन शिकायला मिळतं आणि प्रेक्षकांपर्यंत अर्थपूर्ण कथा पोहोचण्याची संधी मिळते, हेच तिच्यासाठी सर्वात मोठं यश असल्याचं ती म्हणाली.
मिसेस या चित्रपटाचा उल्लेख करताना सान्याने सांगितलं की, या भूमिकेमुळे तिला अनेक माहिलांच्या आयुष्याशी जवळून परिचय झाला. चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिने अनेक माहिलांशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांमधून तिला समाजातील अनेक वास्तव गोष्टी समजल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक महिलांनी तिच्याशी संपर्क साधून ही कथा त्यांच्या स्वत:च्या आयुष्याशी जुळत असल्याचं सांगितलं. हा प्रतिसाद तिच्यासाठी भावनिक आणि विचार करायला लावणारा होता.
सान्याने स्त्रीवादाबद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. तिच्या मते, काही वर्षांपूर्वी या संकल्पनेचा अर्थ तिला नीट माहिती नव्हता. मात्र मुंबईत आल्यानंतर, विविध अनुभव घेतल्यानंतर आणि अनेक गोष्टी वाचल्यानंतर तिचा दृष्टीकोन बदलला. समाजात महिलांवर अजूनही अनेक मर्यादा लादल्या जातात, हे तिला हळूहळू जाणवलं. फक्त महिलाच नाही, तर पुरुषांनाही ठरावीक चौकटीत राहण्याचा दबाब सहन करावा लागतो. असंही ती म्हणाली.
तिच्या मते, स्त्रीवाद म्हणजे महिलांना पुरुषांपेक्षा वरचढ ठरवणं नाही. प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि सन्मान मिळावा, हीच त्यामागची भावना आहे. समाजाने पुरुषांवरही अनेक अपेक्षांचं ओझं टाकलं आहे. भावना व्यक्त करू नयेत, नेहमी कठोर राहावं, अशा अनेक गोष्टी त्यांच्यावर लादल्या जातात. त्यामुळे समानतेचा विचार हा दोघांसाठीही महत्त्वाचा असल्याचं सान्याचं मत आहे.
तिने आपल्या आईचाही उल्लेख केला. तिच्या आईला फॅशन डिझायनर बनण्याचं स्वप्न होतं, पण परिस्थितीमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही. अशा अनेक महिलांची स्वप्नं जबाबदाऱ्यांमध्ये हरवून जातात, ही बाब तिला कायम अस्वस्थ करते. त्यामुळे पडद्यावर अशा कथा मांडण्याची जबाबदारी कलाकार म्हणून आपली आहे, असं ती मानते.
सान्याच्या मते, चित्रपट समाज एका दिवसात बदलू शकत नाहीत. मात्र एखादा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या विचारांमध्ये थोडासा का होईना बदल झाला, तरी त्याचं समाधान असतं. चर्चेला सुरुवात होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच ती लोकप्रियतेपेक्षा आशयाला अधिक महत्त्व देते.
आज सान्या मल्होत्रा ही केवळ चांगली अभिनेत्री म्हणून नव्हे, तर विचारपूर्वक भूमिका निवडणारी कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी वेगळं सांगण्याचा तिचा प्रयत्न कायम राहिला असून, याच गोष्टीमुळे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.






