( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता मराठी रुपेरी पडद्यावर नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. सहजसुंदर अभिनय आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा निमिष आता ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकानंतर हिंदी चित्रपट ‘अग्नि’मध्ये झळकलेल्या निमिषने सध्या ‘सनई चौघडे’ मालिकेतील भूमिकेनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ‘द्विधा’मध्ये तो आदित्य (आदि) ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
आदि हा मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू तरुण असून कुटुंबाला एकत्र ठेवणारा शांत आधार आहे. श्रावणीचा आत्येभाऊ असलेला आदि बालपणापासून तिच्यासोबत वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात विश्वास, आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा दिसून येतो. कमी बोलणारा पण प्रत्येकाच्या मनातील भावना अचूक ओळखणारा आदि ही व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला, “‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यातील भावनांचा प्रवास आहे. या भूमिकेमुळे अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाले. दिग्दर्शक निलेश नाईक यांच्या संवेदनशील दिग्दर्शनाखाली आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी माझ्यावर आजवर भरभरून प्रेम केलं आहे. ‘द्विधा’मधील माझी भूमिका देखील त्यांना आवडेल, अशी आशा आहे.”
‘द्विधा’ या चित्रपटात बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील जिव्हाळा हळुवारपणे मांडण्यात आला आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून विदुला रमेश आजगावकर या निर्मात्या आहेत.
चित्रपटातील कलाकार मंडळी
चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.






