फोटो सौजन्य - Social Media
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा २०२६ यंदा ६ ऑगस्ट रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे पार पडणार आहे. ११व्या फिल्मफेअर मराठी पुरस्कारांची नामांकने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. यावेळी फिल्मफेअरचे एडिटर-इन-चीफ जितेश पिल्लई आणि अभिनेत्री Amruta Khanvilkar उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन Siddharth Chandekar आणि Amey Wagh करणार असून पुरस्कार सोहळा लवकरच सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे.
देव आनंद यांचे चिरंजीव सुनील आनंद यांना देवाज्ञा! जिथे वडिलांनी प्राण सोडले, तिथेच प्राणज्योत माळवली
यंदाच्या नामांकनांमध्ये ‘दशावतार’ने सर्वाधिक २२ नामांकने मिळवत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ ‘अता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटांना प्रत्येकी १९, तर ‘एप्रिल मे ९९’ला १७ नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्तम चित्रपट या विभागात ‘एप्रिल मे ९९’, ‘अता थांबायचं नाय!’, ‘दशावतार’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘जारण’ आणि ‘स्थळ – अ मॅच’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगणार आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) या विभागात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भारत जाधव, ललित प्रभाकर, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांना नामांकन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) या विभागात रेणुका शहाणे, अमृता सुभाष, सई ताम्हणकर, हृता दुर्गुळे आणि साजिरी जोशी यांची निवड झाली आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात हेमंत ढोमे, जयंत दिगंबर सोमळकर, रोहन मापुसकर, ऋषिकेश के. गुप्ते, शिवराज वायचळ आणि सुबोध खानोलकर यांच्यात स्पर्धा होणार आहे. समीक्षकांच्या सर्वोत्तम चित्रपट विभागात ‘देवमाणूस’, ‘गोंधळ’, ‘सबर बॉन्डा’, ‘स्थळ – अ मॅच’, ‘तीन पायांचा घोडा’ आणि ‘उत्तर’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक या विभागातही अनेक नवोदित दिग्दर्शकांना संधी मिळाली आहे.
यावेळी बोलताना अमृता खानविलकर म्हणाल्या की, फिल्मफेअर पुरस्कार हा प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण असतो. मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचा अभिमान वाटत असून यंदाच्या नामांकनांची घोषणा करताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर जितेश पिल्लई यांनी मराठी चित्रपटसृष्टीने सातत्याने दर्जेदार कथा, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगत सर्व नामांकितांचे अभिनंदन केले. यंदाचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलावंत आणि चित्रपटांचा गौरव करणारा संस्मरणीय सोहळा ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






