(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
swapnasundari movie Promotion : रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी राबवलेलं ‘Can We Attend Your Wedding?’ हे हटके कॅम्पेन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. या मोहिमेअंतर्गत अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांनी थेट चाहत्यांच्या लग्नाला उपस्थित राहून नवदांपत्यांना सुखद धक्का दिला.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नवदांपत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भूषण व सायली यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं. त्यापैकी काही निवडक लग्नसोहळ्यांना कलाकारांनी उपस्थित राहत नवविवाहितांच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
या अनपेक्षित भेटीमुळे लग्नसोहळ्यातील आनंद आणखी द्विगुणित झाला. नवदांपत्यांसोबत फोटो, सेल्फी, गप्पा, शुभेच्छा आणि धमाल मस्ती करत भूषण आणि सायली यांनी प्रत्येक कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण अनुभवले. या भेटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या अनोख्या प्रमोशनचं कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना भूषण प्रधान आणि सायली पाटील म्हणाले, “या कॅम्पेनला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खूप खास आहे. प्रत्येक लग्नात उपस्थित राहणं शक्य नसल्याची खंत आहे. मात्र ज्या विवाहसोहळ्यांना आम्ही गेलो, तिथे आम्हाला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम मिळालं. नवदांपत्यांच्या आनंदात सहभागी होत आम्हीही मनापासून आनंद लुटला. आता प्रेक्षकांनी ‘स्वप्नसुंदरी’ चित्रपट पाहून राघवला त्याची खरी ‘स्वप्नसुंदरी’ मिळते का, हे २४ जुलैपासून चित्रपटगृहात अनुभवावं.”
सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट रोमँस, कौटुंबिक नाट्य, विनोद आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा घेऊन २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






