(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Marathi Natak: पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका आता सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसू लागला आहे. नाटक यशस्वीपणे रंगमंचावर सादर होण्यासाठी कलाकारांइतकीच पडद्यामागील बॅकस्टेज टीमचीही मेहनत महत्त्वाची असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाच्या प्रयोगाला मोठा विलंब झाला. अशा परिस्थितीत अभिनेते संजय नार्वेकर आणि इतर कलाकारांनी स्वतःच पुढाकार घेत नेपथ्य उभारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवरील ‘नाटकवेडा मराठी माणूस’ या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये संजय नार्वेकर, चेतना आणि इतर कलाकार नाटकासाठी लागणारे फर्निचर व नेपथ्याचे साहित्य स्वतः उचलून रंगमंचावर मांडताना दिसत आहेत.
पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे १ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात होणाऱ्या ‘भ्रमाचा भोपळा’च्या प्रयोगासाठी नेपथ्य घेऊन येणारी बस तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडली.
दरम्यान, संजय नार्वेकर आणि इतर कलाकार वेळेत नाट्यगृहात पोहोचले होते. मात्र, नेपथ्य वेळेवर न आल्याने प्रयोग सुरू होण्यास विलंब होणार हे स्पष्ट झाले. यावेळी संजय नार्वेकर यांनी स्वतः रंगमंचावर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या या प्रामाणिक संवादामुळे प्रेक्षकांनीही संयम दाखवत कलाकारांना सहकार्य केले.
View this post on Instagram
अखेर रात्री १०.०३ वाजता नेपथ्याची बस नाट्यगृहात पोहोचली. प्रयोग आणखी लांबू नये म्हणून संजय नार्वेकर, चेतना आणि संपूर्ण कलाकारांसह बॅकस्टेज टीमने सेटचे साहित्य स्वतः उचलून नेपथ्य उभारण्यास सुरुवात केली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे अल्पावधीतच तयारी पूर्ण झाली आणि रात्री १०.४० वाजता नाटकाचा पडदा उघडला.
वाहतूक कोंडीसारख्या मोठ्या अडचणीवर कलाकारांची जिद्द आणि प्रेक्षकांच्या संयमामुळे मात करता आली. या प्रसंगानंतर संजय नार्वेकर आणि संपूर्ण टीमच्या समर्पणाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, “शो मस्ट गो ऑन” या उक्तीचा प्रत्यय त्यांनी पुन्हा एकदा घडवून दिला.






