(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस हिंदी सीझन 20’ चा पहिला प्रोमो रिलीज करत शोच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे. यावेळीही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून, प्रोमोमध्ये एका खास ट्विस्टची झलकही दाखवण्यात आली आहे.
जिओहॉटस्टार आणि कलर्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान घोड्यावरून दमदार एन्ट्री करताना दिसतो. यावेळी तो म्हणतो, “करण अर्जुनमध्ये जे घडलं, तेच बिग बॉसमध्ये पुन्हा घडणार आहे.” या संवादामुळे नव्या सीझनबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे, “एकापेक्षा दोघे बरे! बिग बॉस 20, ६ सप्टेंबरपासून जिओहॉटस्टार आणि कलर्सवर.”
निर्मात्यांच्या निवेदनानुसार, प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाही प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मात्र, या वेळी संपूर्ण सीझन एका अशा रहस्याभोवती फिरणार आहे, जे यापूर्वीच्या कोणत्याही सीझनमध्ये पाहायला मिळाले नव्हते.
नव्या सीझनबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, “पहिला संकेत आधीच दिला आहे. तो समजून घ्यायचा असेल तर प्रोमो दोनदा पाहावा लागेल. हा फक्त ट्रेलर आहे. सीझन सुरू झाल्यावर प्रेक्षक हे संकेत जोडून संपूर्ण रहस्य उलगडतील.”
‘बिग बॉस हिंदी सीझन 20’चा प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. हा शो जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होईल, तसेच कलर्स टीव्हीवरही प्रसारित केला जाईल. अद्याप स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
मागील सीझनमध्ये गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’ची ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता नव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






