‘आई तुळजाभवानी’मध्ये रंगणार महादेव-तुळजाभवानीचा भव्य विवाहसोहळा; १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट
या विवाहासाठी वैकुंठातून विष्णू आणि लक्ष्मी महालात येतात. वधूसारखी सजलेली देवी पाहून लक्ष्मी आनंद व्यक्त करते, तर विष्णू पुढील संघर्षाची अप्रत्यक्ष चाहूल देतात. या दरम्यान महादेवांना मिळणारे आदिशक्तीचे गूढ संकेत, आदिशक्तीने या संकेतांचा अज्ञात ठेवलेला अर्थ, महिषासुराची देवीच्या आश्रयास आलेली पत्नी असुर सम्राज्ञी शुंभाचे हळूहळू उघडकीस येणारे कारस्थान, देवीची वाड्यातून बहिष्कृत केलेली सखी पद्माचा एका दुसऱ्या शक्तीच्या शोधाचा प्रवास या साऱ्या नाट्यमय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक मनमोहक भव्य विवाहविधी संपन्न होत आहेत, यात देवीच्या हातात चुडा भरण्याचा कार्यक्रम विशेष ठरणार असून देवीच्या हातात प्रत्यक्षात हा चुडा कोण भरते, हे रहस्य प्रेक्षकांना चकित करणारे असेल. त्यानंतर देवीचा मांडव उभारण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून समस्त शक्तीरुपिणी देवींद्वारे उभे केले जाणारे प्रतिरक्षा शक्ति कवच हे अद्भुत नयनरम्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच इतके भव्य ग्राफिक्स साकारले जाते आहे.
या विवाहसोहळ्यात हळदीच्या विधीत यमाई, मायाक्का, काळुबाई, आंबेजोगाई आणि मळगंगा सहभागी होत भव्य नृत्य-गायनाचा सोहळा रंगतो. मात्र, इथून एक नव्या दैवी अध्यायाचे रहस्य उलगडू लागते. हळद, महादेवांचं वऱ्हाड आणि प्रत्यक्ष लग्न यात उलगडणारे हे रहस्य एका वेगळ्या दैवी अनुभवाचा प्रत्यय प्रेक्षकांना देईल, ज्याला एका भव्य साग्रसंगीत विवाहसोहळ्याची जोड आहे. तेव्हा नक्की पहा आणि अनुभवा आई तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना !
मकरंद माने (मालिकेचे निर्माते – लेखक) याविषयी बोलताना म्हणाले, “आई तुळजाभवानीच महात्म्य दृश्य स्वरुपात साकारण्याच कार्य आम्हा सर्व टीमला मिळाले हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. गेले ५००-६०० भागांचा टप्पा पूर्ण केला आणि आता आई तुळजाभवानी महात्म्य मधील महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत ते म्हणजे लग्न विधी. ह्या संपूर्ण लग्न सोहळा मांडताना विशेष आनंद पण होतो आणि दडपण पण येतय की आपण ह्या सोहळ्याला पूर्ण न्याय द्यायला हवा. त्या दिशेने काम करताना एक वेगळा संचार संपूर्ण टीममधे आहे. गेले दोन महिने चॅनेल आणि प्रॉडक्शन टीम दिवसरात्र सर्वजण झपाटल्यासारखे काम करत आहेत. लग्नाचा काळ हा पौराणिक काळ आहे त्यामुळे प्रत्येक विधी हा अभ्यासपूर्वक करण्याचा आमचा ध्यास आहे. संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आईचा महिमा तेवढाच भव्य असण्याकडे जाणीवपूर्ण लक्ष दिले जात आहे.
हे साकारणाऱ्या कलाकारांची साथ तेवढीच मोलाची ठरते आहे. आता सेटवर जणू लग्नघर असल्याचा माहोल आहे. जो-तो उत्साहाने, जबाबदारीने आपली-आपली कामे पार पाडतो आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो आहे की ह्या मालिकेचा मी एक भाग आहे. आपली असलेली आईराजावरची श्रद्धा आणि तिची अश्या पद्धतीने भक्ती करण्याचं सौभाग्य मिळतय ह्या पलीकडे आयुष्यात अजून काय साध्य करायचे. हा भव्य दिव्य लग्नसोहळा आई चरणी आम्ही अर्पण करत आहोत.” या भव्य विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊया, आई तुळजाभवानी २८ एप्रिल ते २८ मे ,दररोज रात्री ९ वाजता आपल्या कलर्स मराठीवर नक्की पाहा…






