( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Mrunal Dusanis: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस हिने अनेक गाजलेल्या मालिकांमधून सोज्वळ आणि संवेदनशील भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पडद्यावर जशी ती साधी आणि मनमिळावू दिसते, तशीच ती खऱ्या आयुष्यातही असल्याचं तिच्या चाहत्यांना नेहमीच जाणवतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, लग्नाबद्दल आणि लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने सांगितले की, तिचे आणि नीरज मोरे यांचे अरेंज मॅरेज आहे. तिच्या वडिलांमुळेच हे लग्न जुळले. नीरज हा अभिनय क्षेत्राशी संबंधित नसून परदेशात वास्तव्यास आहे. त्यामुळे लग्नानंतरही दोघांना जवळपास सात वर्षे वेगळे राहावे लागले.
याबद्दल बोलताना ती म्हणाली, “आमच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. पण त्यापैकी आम्ही फक्त ४ वर्षेच एकत्र राहिलो आहोत. उर्वरित काळ लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये गेला.”
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपच्या अनुभवावर बोलताना मृणालने स्पष्ट शब्दांत सांगितले की, शक्य असेल तर असा निर्णय टाळावा.
ती म्हणाली, “मला वाटतं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप करूच नये. आता आम्ही आमच्या मुली नुर्वीचा विचार करतो, तेव्हा मलाही आणि नीरजलाही असंच वाटतं की अशी वेळ येऊ नये. आजच्या डिजिटल युगात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीबद्दल नीट माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे.”
मृणालने पुढे सांगितले की, दहा-अकरा वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजच्या काळात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप अधिक आव्हानात्मक झाली आहे.
“माणूस चांगला असेल, तर तो कितीही दूर असला तरी मनाने जवळ असतो. मात्र, त्यासाठी दोघांमध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. हल्लीच्या काळात माझ्यासाठी तरी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप खूप कठीण वाटते,” असेही तिने स्पष्ट केले.
मृणाल दुसानिसच्या या अनुभवातून नात्यातील विश्वास, संवाद आणि समजूतदारपणाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दलचा वास्तववादी दृष्टिकोनही समोर आला.






