( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
प्रेक्षकांच्या मनोरंजनासोबतच महिला सक्षमीकरणावर आधारित आशयपूर्ण मालिका सादर करणारी Sun Marathi वाहिनी पुन्हा एकदा एका नव्या मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सौभाग्यवती वृंदा मोहन या आगामी मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य आणि थरारामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मालिकेच्या पहिल्याच प्रोमोमध्ये वृंदा नावाची एक तरुणी तिच्या हरवलेल्या नवऱ्याचा शोध घेताना दिसते. मात्र हा शोध तितका सोपा नसून त्यादरम्यान तिला अनेक अडचणी आणि अनपेक्षित प्रसंगांचा सामना करावा लागतो. नवऱ्याच्या शोधामागे नेमकं कोणतं गूढ दडलं आहे, याची उत्सुकता प्रोमोमधून निर्माण करण्यात आली आहे.
रहस्य, थरार, नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि भावनिक चढ-उतार यांची अनोखी सांगड या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित वळणांचा सामना करत वृंदाचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.’सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेचा सौभाग्य रक्षणाचा थरारक प्रवास ६ जुलैपासून सुरू होणार असून, मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे.
अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे साकारत आहे. रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेल्या या मालिकेबद्दल बोलताना स्वातीने तिच्या भूमिकेविषयी खास माहिती दिली.
स्वाती म्हणाली, “‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ हे नाव आणि मालिकेची कथा इतकी भन्नाट आहे की मी लगेचच या मालिकेसाठी होकार दिला. वृंदा हे पात्र खूपच वेगळं आणि रंजक आहे. स्वतःच्या नवऱ्याचा शोध घेण्यासाठी ती मुंबईत पोहोचते, पण तिथे तिच्यासोबत नेमकं काय घडतं, हे प्रेक्षकांसाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे.” मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही तिने सांगितले. “प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी कौतुक केलं आहे. मात्र सगळ्यांनाच उत्सुकता आहे की मालिकेत पुढे काय घडणार?” असे ती म्हणाली.
तिने वृंदाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगताना म्हटले की, “वृंदा म्हणजे जणू आधुनिक सावित्रीच आहे. मोहनसाठी ती काहीही करू शकते. अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही ती मागे-पुढे पाहणार नाही. त्यामुळे मालिकेत प्रेक्षकांना ड्रामा, सस्पेन्स, थ्रिल आणि भावनांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.”
स्वातीसाठी ही भूमिका आणखी खास आहे, कारण ती पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. “पहिल्यांदाच मुख्य भूमिका करत असल्यामुळे जबाबदारी आणि थोडंसं दडपणही आहे. मात्र प्रेक्षकांना वृंदाचा हा प्रवास नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे,” असे तिने सांगितले.
स्वाती म्हणाली, “मी अनेकदा मुख्य भूमिकांसाठी ऑडिशन्स दिल्या होत्या, पण काही ना काही कारणामुळे त्या भूमिका माझ्या वाट्याला येत नव्हत्या. कदाचित त्या भूमिकांसाठी मी बनले नव्हते. मात्र ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’मधील वृंदाचे पात्र वाचल्यानंतर ही भूमिका मलाच मिळावी, अशी मनापासून इच्छा होती.”
ती पुढे म्हणाली, “खरं तर वृंदाचं पात्र वाचल्यानंतर मी फक्त ते मॅनिफेस्ट करत होते. आणि जेव्हा माझी निवड झाल्याचा फोन आला, तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती वेळ आली की आपल्यासाठी जे योग्य असतं ते नक्की मिळतं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”
स्वातीने यापूर्वीही Sun Marathi वाहिनीसोबत काम केले आहे. मात्र यावेळी ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला आहे.”यापूर्वी मी सन मराठीसोबत काम केलं आहे, पण मुख्य भूमिकेतून प्रथमच प्रेक्षकांसमोर येत असल्याचा मला खूप आनंद आहे,” असेही ती म्हणाली.रहस्य, थरार, भावना आणि नात्यांमधील गुंतागुंत यांची सांगड घालणारी ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ ही मालिका ६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, स्वाती भिंगारदिवेच्या मुख्य भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.






