(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारतातील लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने आपल्या गाजलेल्या रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. हा बहुप्रतीक्षित सीझन 13 ऑगस्टपासून जगभरातील प्रेक्षकांसाठी स्ट्रीम होणार असून, दर गुरुवारी नवीन भाग प्रदर्शित केले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या ‘द ट्रेटर्स’ या रिअॅलिटी फॉरमॅटच्या भारतीय आवृत्तीची निर्मिती धर्माटिक एंटरटेनमेंटने केली आहे. हा शो IDTV च्या BAFTA आणि Emmy पुरस्कार विजेत्या ग्लोबल फॉरमॅटवर आधारित असून, ऑल3मीडिया इंटरनॅशनलच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.
दुसरा सीझन पहिल्यापेक्षा अधिक भव्य, धाडसी आणि नाट्यमय असणार आहे. सायकोलॉजिकल गेम्स, भावनिक संघर्ष, जबरदस्त सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा यांचा संगम या नव्या पर्वात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, करण जोहर पुन्हा एकदा या विश्वास आणि विश्वासघाताच्या थरारक खेळाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
यावेळी तब्बल 21 सेलिब्रिटी स्पर्धक प्रतिष्ठेचे विजेतेपद आणि ग्रँड प्राइज जिंकण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. जगभरातील 40 हून अधिक देशांमध्ये या शोच्या विविध आवृत्त्या सादर करण्यात आल्या असून, ‘द ट्रेटर्स’ हा सध्या सर्वाधिक लोकप्रिय आणि वेगाने वाढणाऱ्या रिअॅलिटी फॉरमॅट्सपैकी एक मानला जातो.
प्राइम व्हिडिओ इंडियाचे ओरिजिनल्स विभागाचे प्रमुख निखिल माधोक म्हणाले, “‘द ट्रेटर्स’च्या पहिल्या सीझनला मिळालेला प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा होता. हा शो केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एक सांस्कृतिक घटना बनला. दुसऱ्या सीझनमध्ये दांव अधिक मोठे, खेळ अधिक तीव्र आणि ड्रामा अधिक दमदार असेल. करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून परतत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
ऑल3मीडिया इंटरनॅशनलच्या APAC विभागाच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सबरीना डुगुए यांनी सांगितले की, भारतीय आवृत्तीने पहिल्याच सीझनमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली असून, दुसऱ्या सीझनद्वारे हा उत्साह आणखी वाढेल, असा त्यांना विश्वास आहे.
दरम्यान, धर्माटिक एंटरटेनमेंटच्या टीमनेही दुसरा सीझन अधिक भव्य, अधिक धाडसी आणि अधिक नाट्यमय असल्याचे सांगितले. पहिल्या पर्वाची अनपेक्षित आणि सायकोलॉजिकली ग्रिपिंग शैली कायम ठेवत, नव्या सीझनमधून प्रेक्षकांना आणखी थरारक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘द ट्रेटर्स’ सीझन 2 हा शो 13 ऑगस्टपासून फक्त प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार असून, प्रत्येक गुरुवारी त्याचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






