महाड तालुका आजही 'कुपोषणग्रस्त' (फोटो - istockphoto)
महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’
‘पूर्णतः कुपोषणमुक्त महाड’, हेच लक्ष्य
‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक
चंद्रहास नगरकर/ महाड: रायगड जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी जाहीर झाली आहे यामध्ये ४५४ बालकांचा समावेश असून त्यापैकी ६१ तीव्र कुपोषित तर ३९३ मध्यम कुपोषित असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार समजते. मागील आकडेवारीचा विचार करता जिल्ह्यातील कुपोषणाचा दर एकंदरीत घटत असल्याची समाधानकारक बाब या निमित्ताने निदर्शनास येत आहे. या जिल्ह्याच्या आकडेवारीच्या अनुषंगाने तालुक्याचा आढावा घेतला असता महाड तालुका आजही पूर्णतः कुपोषणमुक्त(Health News) झाला नसल्याचे दिसून येत आहे मात्र आरोग्य विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही संख्या घटल्याचे निश्चितच समाधान आहे.
महाड तालुक्यातील कुपोषण निर्मूलनाच्या प्रयत्नांना गती मिळत असली, तरी तालुका अद्याप पूर्णपणे कुपोषणमुक्त होऊ शकलेला नाही. पंचायत समिती महाड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे कुपोषित बालकांची संख्या नियंत्रणात राहिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विभागाचे विस्तार अधिकारी ओंकार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ अखेर महाड तालुक्यात गंभीर कुपोषित (एसएएम) बालकांची संख्या – ११ असून मध्यम कुपोषित बालकांची संख्या ६० असल्याची नोंद झाली आहे.
मुलांच्या आरोग्याला मिळू शकते बळ, वेळीच कुषोषणाला घाला आळा; काय घ्यावी काळजी
सेविकांच्या सहाय्याने पोषणपूरक आहार
महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल संगोपन उपक्रमांतर्गत कुपोषित बालकांना त्यांच्या वजनानुसार योग्य प्रमाणात पौष्टिक आहार मोफत पुरविण्यात येऊन अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तो बालकांना योग्य त्या प्रमाणात दिला जातो, त्याचप्रमाणे गरोदर व स्तनदा मातांसाठी दर महिन्याला मोफत पोषण आहार देखील पुरविण्यात येतो.
महाड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या ग्रामीण, डोंगराळ व आदिवासी वस्त्यांनी नटलेला असल्याने कुपोषणाची समस्या पारंपरिकपणे जाणवणारी आहे. तरीही, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कुपोषणाचा सध्याचा दर सातत्याने घटत असल्याचे अधिकारी सांगतात. कुपोषित बालक पौष्टिक आहार घेतल्यानंतर तो मध्यम कुपोषित वर्गात जातो आणि त्यानंतर तो पूर्णपणे सुदृढ बालक होऊन पूर्णपणे कुपोषणमुक्त होतो प्रत्येक महिन्याला बालकांची नियमित आरोग्य तपासणी करून त्याची उंची, वजन, वाढीचा वेग यांचा विचार केला जातो.
Melghat malnutrition: मेळघाटकडे कोणी लक्ष देईना! सहा महिन्यात 65 चिमुरड्यांचा कुपोषणामुळे मृत्यू
‘पूर्णतः कुपोषणमुक्त महाड’, हेच लक्ष्य
मागील काही वर्षांतील आकडेवारीनुसार, लोकसंख्या वाढ असूनही कुपोषणाचा दर कमी होत असून गरोदरमाता व नवजात बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे दीर्घकालीन सुधारणा दिसून येत आहेत. पोषण आहार, नियमित तपासणी आणि जनजागृती या माध्यमातून भविष्यात महाड तालुका निश्चितच कुपोषणमुक्त करण्याकडे वाटचाल करेल, असा विश्वास एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग अधिकारी पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व प्राप्त असणाऱ्या महाड तालुक्यामध्ये कुपोषण निर्मूलनाचे प्रयत्न यशस्वी दिशेने जात असले, तरी समस्येचे समूळ उच्चाटन करणे गरजेच आहे.






