अयोध्या : प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा सोहळा अयोध्येमध्ये (Ayodhya) पार पडणार आहे. यामुळे देशभरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरण असून राम भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. क्रिकेट विश्वातून अनेक खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आप खासदार व माजी क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे देखील नाव आहे. सध्या हरभजन याने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटविश्वातील महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा अशा अनेक खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी अद्याप सोहळ्याला उपस्थिती लावण्याबाबत स्पष्टता दिलेली नाही. मात्र हरभजन सिंग याने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला येणार असल्याचे स्पष्ट केले. ‘आमचं नशिब इतकं चांगलं आहे की अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं मंदिर बनत आहे. आम्हाला तिथे जाऊन प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. प्रभू रामांवर माझी आस्था आहे आणि तेथे कोण जाणार आणि कोण नाही जाणार यामुळे काही फरक पडत नाही.’ असे स्पष्ट मत हरभजन सिंगने व्यक्त केले. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेंना उधाण आले आहे.
आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र आपचे खासदार हरभजन सिंग यांनी कोणी जाणार नाही यामुळे मला फरक पडणार नसल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, ‘मला काहीच फरक पडत नाही की कोणते राजकीय पक्ष त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नक्की जाणार आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी जाऊ नये.’ असे हरभजन सिंग यांनी आपला घराचा आहेर देत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याचे जाहीर केले.