जाड्या म्हणून हिणवलं, तरुणाने २० KM पर्यंत केला थरारक पाठलाग, दोघांवर झाडल्या गोळ्या
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर घडली आहे. जाड्या म्हणून खिल्ली उडवल्याने संतापलेल्या एका तरुणाने दोन तरुणांवर गोळ्या झाडल्या आहेत. दोन्ही जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अर्जुन चौहान असं आरोपीचं नाव आहे.
पुण्यात एकाचा डोक्यात बांबू घालून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी खजनी पोलिस स्टेशन परिसरात घडली. बेलघाट येथील रहिवासी अर्जुन चौहान त्याच्या काकासोबत मंदिराजवळ आयोजित एका कार्यक्रमात गेला होता. कार्यक्रमादरम्यान मांझरिया गावातील अनिल चौहान आणि शुभम चौहान यांनी अर्जुनला जाड्या म्हणून हिणवायला सुरू केलं. अर्जुनला हे जाड्या म्हणणं अपमानास्पद वाटलं. त्याने त्याचा राग मनात धरला आणि दोघांना धडा शिकवण्याचा प्लान आखला
कार्यक्रमानंतर अनिल चौहान आणि शुभम चौहान माघारी निघाले होते, त्यावेळी अर्जुनने त्यांचा पाठलाग केला. मात्र पहिल्या पर्यत्नात ते पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र अर्जुनने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला होता. दरम्यान तेनुआ टोल प्लाझाजवळ त्याने अनिल आणि शुभमची कार थांबवली. दोघांना खेचून बाहेर काढलं आणि दोघांवरही गोळ्या झाडल्या.
गोळीबाराचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अनिल आणि शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे आणि ते धोक्याबाहेर आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा आढावा घेतला. शुभम चौहानच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि आरोपी अर्जुनला अटक केली. घटनेची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिस अधीक्षक (दक्षिण) जितेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे.