भारतीय जवानाच्या डोळ्यांवर पट्टी, नेमकं काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य-X)
Pahalgam Terror Attack News in Marathi: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याच वेळी एक भारतीय सैनिक भारत-पाकिस्तान सीमा ओलांडून पाकिस्तानी सीमेवर पोहोचला. ही घटना फिरोजपूरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर घडली.
बुधवारी फिरोजपूरमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने झिरो लाईन ओलांडली आणि जवान पाकिस्तानमध्ये पोहचला. त्या सैनिकाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले.सीमारेषेवरील शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात करण्यात आले होते. त्यापैकी, एका जवानाने सीमारेषा पार केल्याने तो पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेला आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी फ्लॅट बैठका घेण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना विशेष परवानग्या घेऊन झिरो लाईनपूर्वी या भागात शेती करण्याची परवानगी आहे. पिकांच्या पेरणी आणि कापणी दरम्यान बीएसएफचे जवान त्यांच्यासोबत तैनात असतात. त्यांना शेतकरी रक्षक असेही म्हणतात. काटेरी तार झिरो लाईनच्या खूप आधी आहे. झिरो लाईनवर फक्त खांब बसवले आहेत. पाकिस्तानने आपल्या बाजूला काटेरी तार बसवलेली नाही. या उष्णतेमुळे, सैनिक चुकून झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानी सीमेत जाऊन झाडाच्या सावलीत बसला. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके येथील बीएसएफ चेकपोस्टवर पोहोचले आणि त्यांनी बीएसएफ जवानाला ताब्यात घेतले आणि त्याची शस्त्रे जप्त केली.
या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी सीमेवर पोहोचले. जवानाच्या सुटकेसाठी सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफ अधिकाऱ्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत ध्वज बैठका सुरू होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ बटालियन-२४ श्रीनगरहून ममदोट येथे हलवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी, शेतकरी कुंपणावरील गेट क्रमांक २०८/१ मधून त्यांच्या शेतातून गहू कापण्यासाठी कंबाईन हार्वेस्टरसह गेले. शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत दोन बीएसएफ जवानही होते. या काळात सैनिकाने चुकून सीमा ओलांडली. बीएसएफने अद्याप याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. ध्वज बैठक सुरू आहे.