भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’

भारताच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स ओलांडल्याच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश यांनी याला फेक न्यूज म्हटले आहे.

  काँग्रेसने सोमवारी (20 नोव्हेंबर) भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याचा केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा ठरवला. सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की,या फेक न्यूजचा उद्देश केवळ वातावरणनिर्मिती करणे आणि मथळे तयार करण्याचा प्रयत्न आहे.

  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यात व्यस्त होता.त्यावेळी, राजस्थान आणि तेलंगणाचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी ट्विट केले होते की, भारताचा जीडीपी आकडा प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे.’

  काँग्रेस नेते जयराम म्हणाले की, हे वृत्त पूर्णपणे खोटे असून, हा केवळ बेफिकीरपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. रविवारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर या संदर्भात पोस्ट केली होती. एका दिवसानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या सर्व टिप्पण्यांवर प्रत्युत्तर दिले.

  नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे – देवेंद्र फडणवीस

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला होता की भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे, यावरून मोदी सरकारची गतिमानता आणि दूरदर्शी नेतृत्व दिसून येते. नवा भारत अतिशय सुंदरपणे प्रगती करत आहे

  भारतासाठी जागतिक अभिमानाचा क्षण – गजेंद्र सिंह शेखावत

  ट्विटरवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले होते की, भारतासाठी हा जागतिक अभिमानाचा क्षण आहे कारण आपला जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या भारताचा उदय खरोखरच अनोखा आहे.

  दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – गौतम अदानी

  X वर स्क्रीनशॉट शेअर करताना गौतम अदानी यांनी लिहिले, “अभिनंदन भारत, फक्त दोन वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. आम्ही जपानची 4.4 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि जर्मनीची 4.3 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था मागे टाकू. तिरंगा फडकतच राहील, जय हिंद.