देशाच्या स्वातंत्र्यावर टीका केल्यामुळे मोहन भागवत यांच्यावर राहुल गांधींची जोरदार टीका (फोटो - सोशल मीडिया)
दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसने आपले नवीन मुख्यालय उभारले आहे. कॉंग्रेसच्या या नवीन कार्यालयाचे नाव इंदिरा भवन असे असणार आहे. खासदार सोनिया गांधी यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी इंदिरा भवनच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये संवाद साधला. यावेळी राहुल गांधी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा देखील उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही, असे मत खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे राहुल गांधी आरएसएसचे संचालक मोहन भागवत यांच्या राम मंदिर उद्घाटनावेळी स्वातंत्र्य मिळाले असल्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “मोहन भागवत सार्वजनिकपणे असं वक्तव्य करतात. जर दुसऱ्या एखाद्या देशात त्यांनी असं वक्तव्य केलं असतं तर त्यांना अटक झाली असती. तसंच त्यांच्यावर खटला भरवला गेला असता. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही असं म्हणणं हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे. आता ही वेळ आली आहे की मोहन भागवत जी वायफळ बडबड करतात ती आपण ऐकणं बंद केलं पाहिजे. कारण आता लोकांना कळलं आहे की एकच एक वक्तव्य हे लोक अशाच प्रकारे बोलत राहतील आणि तेच खरं आहे असं ओरडत राहतील,” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणूकसंबंधी बातम्या वाचा
राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्ष भाजप तपासयंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “आपल्या देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. कारण ईडी, सीबीआय यांना एकच काम दिलं जातं ते म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांना घेरा आणि त्यांना तुरुंगात धाडा. तसंच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकीची आम्ही मागतो आहोत ती माहिती दिली पाहिजे अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.