कापून व्हिडिओ टाकणं कॉंग्रेसला भोवलं; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे.

    दिल्ली : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध कॉंग्रेस असे चित्र अनेकदा दिसत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

    कॉंग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांचे मुलाखतीमधील आधीचे वाक्य कापून पुढची व्हिडिओ दाखवत आली आहे. यामुळे नितीन गडकरी यांच्या ऑफिसकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये लिहिले आहे की, हा व्हिडीओ १९ सेकंदांचा असून त्याचा उपयोग बदनामी तसेच भाजपाच्या नेत्यांत संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जातो आहे. काँग्रेसच्या मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचा वेगळा अर्थ काढण्यात आलाय. या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आलीय. या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आलेला दावा हा संदर्भहीन असून त्याला कोणताही आधार नाही शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओचा पूर्ण संदर्भ माहीत असूनही मुद्दामहून व्हिडीओतील विधानांचा अर्थ लपवून तो हिंदी कॅप्शनसहित पोस्ट करण्यात आला. प्रतिष्ठा खराब करण्यासाठी द्वेषभावनेने करण्यात आलेले हे कृत्य आहे, असे नितीन गडकरी यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे.

    त्याचबरोबर भाजपकडून नितीन गडकरी यांचा पूर्ण व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. हे शेअर करताना लिहिण्यात आले आहे की, ‘नितीन गडकरी यांच्या नावाने कॉंग्रेसचा खोटारडेपणा’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्याचबरोबर या नोटिसमध्ये गडकरी यांनी काँग्रेसला हा व्हिडीओ हटवण्यास सांगितलंय. तीन दिवसांच्या आत लेखी स्वरुपात माफी मागावी, अशीही मागणीही गडकरी यांनी केलीय. माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांनी दिला आहे.