दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग झाले (फोटो - सोशल मीडिया)
रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दिल्लीहून बागडोगरा (पश्चिम बंगाल) येथे जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करावे लागले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. हे विमान इंडिगोचे होते. विमानाच्या वॉशरुममध्ये टिशू पेपरवर या विमानामध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले होते. हा टिशू पेपर एका प्रवाशाला सापडल्यानंतर त्याने तातडीने हे क्रू मेंबरला दाखवले. या विमानामध्ये एकूण 230 प्रवासी, दोन पायलट आणि पाच क्रू मेंबर प्रवास करत होते.
हे देखील वाचा : आधीच प्रदुषण अन् आता दाट धुके: दिल्ली NCR मध्ये वाहन चालवताना अडथळा, IMD ने दिला इशारा
उड्डाणादरम्यान, बॉम्बच्या धमकीची गोपनीय माहिती मिळाली, त्यानंतर वैमानिकांनी विमान उतरवण्याची परवानगी मागितली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा नियमांचे पालन करून लखनौच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जवळचे विमानतळ म्हणून संपर्क साधला. लखनौमध्ये उतरण्याची परवानगी मिळाल्यानंतर, विमानाने तेथे आपत्कालीन लँडिंग केले. लँडिंगनंतर, विमान धावपट्टीच्या एका सुरक्षित भागात नेण्यात आले, जिथे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा एजन्सी आधीच सतर्क झाल्या होत्या.
हे देखील वाचा : ममता दिदी सावधान! पश्चिम बंगालला PM Modi 830 कोटींची भेट देणार; तर ‘या’ सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकणार
रविवारी सकाळी ८:४६ वाजता एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) ला इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट ६ई-६६५० वर बॉम्बचा इशारा मिळाला. हा इशारा मिळताच लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची तयारी करण्यात आली. आपत्कालीन लँडिंगनंतर विमान एका आयसोलेशन व्हेईकलवर पार्क करण्यात आले. लखनौ विमानतळावर विमान थांबवण्यात आले आणि त्याची कसून तपासणी करण्यात येत आहे. विमानाच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याने प्रवासी, क्रू मेंबर्स आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
अग्निशमन दलाचे अधिकारी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, अग्निशमन दल आणि बीडीएस पथक विमानाची तपासणी करत आहेत. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. टिश्यू पेपरवर बॉम्बचा इशारा कोणी लिहिला आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस या घटनेच्या विविध पैलूंचा तपास करत आहेत.






