राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना संधी

राज्यसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली असून 24 नवीन नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याची योजना तयार केली आहे.

    नवी दिल्ली : राज्यसभा निवडणूक 2024 साठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर झाली असून, 24 नवीन नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने 28 पैकी 24 नवीन चेहऱ्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याची योजना तयार केली आहे. 56 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या खात्यात 28 जागा जाणार आहेत.

    भाजपनेही या 28 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, उमेदवारांची यादी पाहिल्यावर 28 पैकी 24 नावे नव्या चेहऱ्यांची आहेत. तर चार जणांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जात असल्याचे दिसून येत आहे. 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला संख्याबळाच्या जोरावर 27 जागा सहज जिंकता येणार आहेत. उर्वरित एक जागा जिंकण्यासाठी ओडिशात बीजेडीची गरज आहे. 28 उमेदवारांपैकी ज्या चार उमेदवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव, एल मुरुगन आणि भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते सुधांश त्रिवेदी राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

    गुजरातमधून उमेदवारी दाखल करणे विशेष सन्मानाची बाब

    ‘आज मला गुजरातमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा सन्मान मिळत आहे. मी उमेदवारी अर्ज अनेकवेळा, अनेक पदांसाठी भरले आहेत. पण गुजरातमधून उमेदवारी दाखल करणे ही माझ्यासाठी विशेष सन्मानाची बाब आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक समितीचे मनापासून आभार मानतो, अशी भावना जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली.