ममता बॅनर्जींनी केंद्रावर हल्लाबोल (Photo Credit- X)
New GST Rates: आजपासून (२२ सप्टेंबर) जीएसटीच्या नवीन दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जीएसटीचे नवीन दर लागू करण्याची घोषणा केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशाला संबोधित करताना त्याचे फायदे सांगितले होते. मात्र, आता यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नवीन जीएसटी दरांचे श्रेय केंद्र सरकारला घेता येणार नाही, असा दावा ममता बॅनर्जींनी केला आहे. त्या कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “जीएसटीमध्ये केंद्र सरकारचा कोणताही वाटा नाही. विमानावरील जीएसटी हटवावा, अशी मागणी करणारे पत्र मी सर्वात आधी लिहिले होते. जीव वाचवणाऱ्या अनेक औषधांवर आणि छोट्या-छोट्या वस्तूंवरही जीएसटी होता. तुम्हाला हे माहीत असायला हवे की यासाठी केंद्र सरकारचा एकही पैसा खर्च झाला नाही. सर्व पैसा राज्य सरकारच्या खात्यातून गेला आहे, तरीही याचे श्रेय केवळ एकच व्यक्ती घेत आहे.”
JUST IN | “West Bengal government will suffer a loss of Rs 20,000 crore due to #GST rate cuts. No credit for the GST rate cut should be given to the Centre but the credit should be given to the states. We will soon come out with advertisement on the issue,” West Bengal Chief… pic.twitter.com/cOK0Skvp4b — The Hindu (@the_hindu) September 22, 2025
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “१०० दिवसांचे काम बंद आहे, आवास योजना, रस्ते आणि पाणी योजनांसाठी मिळणारा पैसा बंद आहे. सर्व शिक्षा अभियानाचे पैसेही बंद झाले आहेत! यातच आम्हाला पुन्हा २०,००० कोटी रुपयांचे महसुली नुकसान होणार आहे. मी घर कसे चालवणार? तरीही, सामान्य जनतेला याचा लाभ मिळाल्याचा मला आनंद आहे. मात्र, यात दिल्ली सरकारचे किंवा कोणत्याही पक्षाचे श्रेय नाही. हा पैसा आमच्या जीएसटीमधून घेतला गेला आहे. आम्हाला एकच जीएसटी मिळतो, पण नाव स्वतःचे लिहून २०,००० कोटी रुपये आमच्या राज्यातून घेऊन जात आहेत. मी लवकरच जाहिरातीच्या माध्यमातून हे जनतेला सांगेन.”
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारवर माध्यमांवर नियंत्रण ठेवल्याचाही आरोप केला. त्या म्हणाल्या, “नॅशनल मीडियापासून ते सगळ्या माध्यमांवर ‘गोदी मीडिया’ चे नियंत्रण आहे. आता दूरदर्शन दूरदर्शन राहिलेला नाही, तो गोदी दर्शन झाला आहे. ऑल इंडिया रेडिओही गोदी रेडिओ बनला आहे. जे काही करायला सांगितले जाते, तेच २४ तास चालते. आम्हाला बोलण्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही.”