
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असून या भूंकपाच्या धक्क्याने राजधानी दिल्लीतील एनसीआरला हादरा दिला आहे. उत्तर भारताच्या काही भागांतही या भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.
सध्या बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. रुकूम पश्चिम जिल्ह्यात ३६ आणि जाजरकोट येथे २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेपाळच्या PMO कार्यालयानेही ट्वीट करुन घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती, की यामध्ये शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणारे अनेक लोक बाहेर आले. उत्तर प्रदेशातील लखनौ, बस्ती, बाराबंकी, फिरोजाबाद, अमेठी, गोंडा, प्रतापगड, भदोही, बहराइच, गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांशिवाय बिहारमधील कटिहार, मोतिहारी आणि पटना इथंही भूकंपाचे धक्के जाणवले.