आखाती तणावाचा भारतावर मोठा परिणाम? पेट्रोलपासून निर्यातीपर्यंत अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटका
भारताचा मोठा निर्यात-आयात व्यापार मध्यपूर्वेतील देशांशी जोडलेला आहे. विशेषतः युएई, सौदी अरेबीया, कतर, ओमान आणि कुवैत या देशांकडे भारतातून फळे, भाजीपाला, तांदूळ, मांस, कापड, औषधे आणि विविध औद्योगिक वस्तू मोठ्या प्रमाणावर निर्यात केल्या जातात. युद्धपरिस्थितीमुळे समुद्री मार्गामध्ये अडथळे निर्माण होणे, जहाज वाहतुकीचा खर्च वाढणे आणि विमा प्रीमियम वाढणे यामुळे निर्यात प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
परिणामी काही ठिकाणी कंटेनर अडकून राहण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा परिणाम भारतातील प्रमुख बंदरांवरही जाणवू शकतो, विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर सारख्या बंदरांवरील हालचालींवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम शेवटी सामान्य नागरिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढणे, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू महाग होणे, वाहतूक खर्च वाढणे आणि महागाई वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, परिस्थितीवर लक्ष ठेवून भारत सरकार पर्यायी व्यापार मार्गाचा शोध, इतर देशांकडून तेल आयात वाढविणे, बंदर व्यवस्थापन मजबूत करणे आणि निर्यातदारांना मदत करणे यांसारख्या उपाययोजना करू शकते.
उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातील कृषी उत्पादने, समुद्री खाद्य, कापड उद्योग आणि औषध उद्योग यांचा मोठा बाजार मध्यपूर्वेत आहे. युद्धपरिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास निर्यात कमी होऊन उद्योगांवर आर्थिक दबाव निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मध्यपूर्वेतील पायाभूत आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ऊर्जा क्षेत्रावरही या तणावाचा परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा मध्यपूर्वेकडून आयात करतो, विशेषतः इराक, सौदी अरेबीया, आणि युएई हे भारताचे प्रमुख तेल पुरवठादार आहेत. युद्धपरिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होऊ शकतो. इंधन दर वाढल्यास वाहतूक खर्च वाढती आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते.
रोजगाराच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंतेची मानली जाते. आखाती देशांमध्ये सुमारे ८० ते ९० लाख भारतीय नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. युद्धस्थिती तीव्र झाल्यास काही उद्योग आणि प्रकल्पांमध्ये मंदी येऊ शकते, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतात परतणाऱ्या कामगारांची संख्या वाढल्यास देशांतर्गत रोजगारावरही ताण निर्माण होऊ शकतो. तसेच परदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारतात येते. मध्यपूर्वेतील रोजगार परिस्थिती बिघडल्यास ही आवक कमी होऊ शकते. याचा परिणाम अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.






