पतीसोबत नवं आयुष्य, विमान प्रवासाचं स्वप्न, एका क्षणात उद्ध्वस्त; अहमदाबाद विमान अपघातात नववधूचा मृत्यू
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे झेपावणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. आतापर्यंत या अपघातात 204 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली असून, यात राजस्थानमधील एक 21 वर्षीय नवविवाहिता ‘खुशबू’ हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाचं आणि विदेशात पतिला भेटण्याचं तिचं स्वप्न अधूरं राहिलं आहे.
राजस्थानच्या बाळोतरा जिल्ह्यातील अराबा गावातील रहिवासी खुशबू ही नुकतीच विवाहबद्ध झाली होती. तिचं लग्न यावर्षी 18 जानेवारीला जोधपूर जिल्ह्यातील लूणी खाराबेरा गावचे डॉक्टर विपुल यांच्याशी झालं होतं. विवाहानंतर काही महिने सासरी आणि माहेरी राहून ती अखेर लंडनला पतीकडे निघाली होती.
खुशबू वडील आणि चुलत भावासोबत अहमदाबाद विमानतळावर पोहोचली होती. एअर इंडिया फ्लाइट AI-171 मधून लंडनला जाण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र, टेकऑफनंतर विमान काही मिनिटांतच विमान कोसळलं, आणि त्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
खुशबूचे वडील मदनसिंह यांनी विमानतळावर मुलीला निरोप देताना एक फोटो काढला होता. तो फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला होता, ज्यावर लिहिलं होतं – “आशीर्वाद खुशबू बेटा, गोइंग टू लंडन.”मुलीला विमानात बसवून ते आणि चुलत भाऊ परत गावाकडे निघाले होते. पण वाटेतच अपघाताची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
मदनसिंह यांचा गावात मिठाईचा व्यवसाय आणि थोडीफार आहे. खुशबू ही त्यांच्या चार मुलांपैकी सगळ्यात मोठी मुलगी होती. तिच्या मागे दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. लग्नानंतर काहीच महिन्यांनी लंडनला नवऱ्याकडे जाणाऱ्या मुलीचं अचानक असे जाणं संपूर्ण कुटुंबासाठी असह्य वेदना देणारं ठरलं आहे. लंडनला रवाना होण्याच्या वेळी खुशबू आईला बिलगून रडत होती, कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत भावूक होता.
Ahemdabad Plane Crash : टेकऑफ की लँडिंग… कधी असतो विमान क्रॅश होण्याचा सर्वाधिक धोका? वाचा सविस्तर
ही बातमी समजताच अराबा गावात शोकसागर पसरला आहे. लग्न घरात तिच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली .खुशबूचं आयुष्याचं सर्वात गोड स्वप्न, पतीबरोबरचं नवं आयुष्य, विमानप्रवासाच्या त्या काही क्षणांतच उद्ध्वस्त झालं. तिचं पहिलं उड्डाण शेवटचं ठरलं आहे.