फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागांमध्ये दहशतवादी घटना वाढल्या असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढवून दहशतवादी कायवायांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या गटांनी फेसबुक, एक्स, टेलिग्राम आणि डार्कवेबवर विविध पोस्टद्वारे जम्मू-काश्मिरच्या तरूणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन
तज्ञांच्या मते, याचा वापर प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी केला जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याआधी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये अशा 2000 हून अधिक पोस्ट्स नोंदल्या गेल्या होत्या. यामध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या आणि भारताविरोधी प्रचार होता. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि पायाभूक सुविधांवर हल्ल्यांच्या धमक्यांचा समावेश होता. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेसमोर नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत.
हे देखील वाचा- भारतीय नौदलाची महासागरावर सतर्क नजर; देशाच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा सज्ज
दहशतवादविरोधी शून्य सहनशीलता धोरण
अलीकडे दहशतवादी भरती कमी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील दहशतवादावर नियंत्रण आणण्यास भारताला काही प्रमाणात यश आले आहे. 2023 मध्ये फक्त चार स्थानिक तरुण दहशतवादी कारवायांमध्ये भरती झाले, तर 2022 मध्ये 113 होते. सरकारच्या दहशतवादविरोधी शून्य सहनशीलता धोरणाच्या परिणामस्वरूप सरकारी नोकऱ्यांवर, पासपोर्ट, आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर निर्बंध घालण्यात आले. यामुळे ओव्हरग्राउंड सपोर्ट नेटवर्कवर मर्यादा आणता आली आहे. याचे श्रेय जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या दहशतवादाबाबतच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाला दिले जात आहे.
सोशल मीडियामुळे तरूणांना कट्टरवादी बनवण्याच्या समस्येत वाढ
परंतु, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना प्रभावित करण्याच्या प्रयत्नांमुळे समस्या वाढत चालली असून हा प्रयत्न गंभीर असल्याचे सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. निवडणुका झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज असताना, पाकिस्तानच्या आयएसआयने जेईआय नेत्यांवर हल्ल्यांचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात सार्वजनिक अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
ड्रोन कारवायांमध्ये देखील वाढ
याशिवाय, पाकिस्तानी ड्रोन कारवायांतही वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत 40 हून अधिक ड्रोन दृश्ये नोंदवली गेली. यांचा उपयोग शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांची तस्करी करण्यासाठी केला जातो, जे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी गंभीर धोका आहे. या सर्वांवर लक्ष ठेवून, भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पाकिस्तानच्या कटकारस्थानांना प्रत्युत्तर देण्यासाठी कडक उपाययोजना राबवत आहेत.